Sat, Mar 23, 2019 00:23होमपेज › Satara › तासवडे एमआयडीसी अडकली दुष्टचक्रात

तासवडे एमआयडीसी अडकली दुष्टचक्रात

Published On: Jul 09 2018 1:07AM | Last Updated: Jul 08 2018 11:30PMतासवडे टोलनाका : प्रविण माळी

तीन दशकांपूर्वी पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्गालगत तळबीड, तासवडे गावांच्या परिसरात तासवडे एमआयडीसीचा उदय झाला. त्यामुळे तालुक्याच्या औद्योगिक विकासाला चालना मिळण्याबरोबर बेरोजगारांसह जमिनी गेलेल्या शेतकर्‍यांच्या मुलांना नोकर्‍या मिळतील, अशी अपेक्षा होती. मात्र गलथान कारभार, भूखंड वाटपातील घोळ, दलालांचा सुळसुळाट, कामगारांचे शोषण या दुष्टचक्रात एमआयडीसी अडकली आहे. त्यामुळेच एमआयडीसीच्या प्रश्‍नावर

प्रकाशझोत टाकणारी लेखमाला आजपासून...

तीन दशकांपूर्वी तासवडे एमआयडीसीची स्थापना झाली होती. या एमआयडीसीत सध्यस्थितीत 400 कंपन्या कागदोपत्री नोंद आहेत. त्यापैकी 250 ते 260 कंपन्या चालू असून उर्वरित कंपन्या चालू होऊन बंद पडल्याचेही कोणालाच समजले नाही. 

एमआयडीसीतील किर्लोस्कर ब्रदर्स, रॉयल फ्रूट, संतोष मिल्क, टीडीपी अ‍ॅटो, पीडी लाईट, अजंठा युनिव्हर्सल, कराड प्रोजेक्ट अ‍ॅण्ड मोटर्स, ओमकार पॅली प्रोडक्टस्, हिंदुस्थान, कोयना पॅकेजिंग, हिमॅटिक आणि डिकोप्रिंट इंक अ‍ॅण्ड कोटींग यासारख्या कंपन्यात आज शेकडो कामगार कार्यरत आहेत. तर डी लाव्हल यासह सुमारे 150 कंपन्या कर्मचारी व व्यवस्थापन यांच्यातील वाद, कर्मचारी संघटनांची अवास्तव मागण्या, शासनाचे व एमआयडीसी अधिकार्‍यांचे दुर्लक्ष यासह अन्य काही कारणांमुळे बंद पडल्या आहेत. 

एमआयडीसीसाठी तळबीड, वराडे या दोन्ही गावातील शेतकर्‍यांची सुमारे 700 एकर जमिनी संपादित करण्यात आल्या होत्या. जमिनी संपादित करताना स्थानिक उद्योजकांना प्रथम प्राधान्य, स्थानिक युवकांना रोजगार, वराडे व तळबीड या दोन्ही गावातील विकासासाठी सेस फंड देणे यासह अनेक आश्‍वासनांचे ‘गाजर’ दाखवण्यात आले होते.

एमआयडीसीसाठी 1986 ला जमिनी संपादित करण्यात आल्यानंतर 1994 च्या सुमारास प्रत्यक्षात एमआयडीसी सुरू झाल्यानंतर स्थानिक युवकांना चांगल्या नोकर्‍या तसेच स्थानिक उद्योजकांना प्राधान्य मिळण्याची अपेक्षा मात्र फोल ठरली आहे. त्याचबरोबर तळबीड व वराडे गावातील विकासकामांसाठी आर्थिक मदतीचे आश्‍वासन एमआयडीसीकडून पाळण्यात आलेले नाही. 

तीन दशकानंतरही स्थानिकांना देण्यात आलेल्या आश्‍वासनांकडे कानाडोळा करण्यात आल्याने अखेर चार महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीचे पदाधिकारी प्रशांत यादव, शिवाजीराव जाधव, तळबीडचे सरपंच जयवंतराव मोहिते, विजय माळी, भाऊसोा बोराटे, शंकर सुतार यांच्यासह नागरिकांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.