Tue, May 21, 2019 12:41होमपेज › Satara › पवनचक्क्यांविरोधात शेतकर्‍यांचा एल्गार

पवनचक्क्यांविरोधात शेतकर्‍यांचा एल्गार

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

तारळे : वार्ताहर

मरळोशी व जांभेकरवाडी ता. पाटण येथील सुमारे 71 खातेदारांच्या खासगी मालकीच्या जागेत पाच पवनचक्की कंपन्यांनी एक गुंठाही  जमीन न खरेदी करता विविध शासकीय यंत्रणांना हाताशी धरुन सुमारे तीस पवनचक्क्या उभ्या केल्या आहेत.तसेच इतर ठिकाणी थोड्या जमिनी खरेदी करून आजूबाजुच्या जमिनीवर ही अतिक्रमण करुन लोकांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेतल्याचा आरोप करण्यात येत असून या कंपन्यांविरूद्ध शेतकर्‍यांनी न्यायालयीन लढा उभारला आहे.  

महाराष्ट्र शासनाने 2004 पवन ऊर्जा निर्मिती धोरण आखल्याने तालुक्यात पवनचक्क्यांचे मोठे जाळे निर्माण  केले.यामध्ये अनेक कंपन्यांनी पैसे लावून, शासकीय सवलती मिळवून पवनचक्क्या उभ्या केल्या.त्यासाठी दलालांच्या मोठ्या टोळ्या सक्रीय झाल्या होत्या .शेतकर्‍यांकडून कवडीमोल दराने खरेदी करुन दलाल व कंपन्यांनी स्वतःचे उखळ पांढरे  करुन घेतले. शेतकर्‍यांकडून खरेदी केलेल्या जमिनी खरेदी विक्रीचे व्यवहार वादग्रस्त ठरल्याच्या घटना यापूर्वी तालुक्यात घडल्या आहेत. पण मरळोशी व जांभेकरवाडी येथील सुमारे तीस पवनचक्क्या मात्र एक गूंठ्याचीही खरेदी न करता उभ्या राहील्याने प्रशासनाकडून न्याय मिळण्याची शक्यता कमी असल्याने शेतकर्‍यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे.

मरळोशी व जांभेकरवाडी सह सडावाघापूर घोट, ढोरोशी, जळव, कळंबे या ठिकाणी वेगवेगळ्या पाच कंपन्यांच्या पवनचक्क्या उभ्या आहेत.अनेक कारणांनी या पवनचक्क्या वादग्रस्त आहेत. शेतकर्‍यांची फसवणूक  झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी तानाजी घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली न्यायालयीन लढा सुरु केला आहे. व त्यांच्या जमिनीवरील कंपन्यांचे पवनचक्क्यांचे अतिक्रमण काढण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत .

मरळोशी व जांभेकरवाडी येथील सुमारे 71 खातेदारांच्या वडीलोपर्जित दोनशे दहा एकर समाईक जमिनी आहेत.या जमिनी डोंगरामाथ्यावर असल्याने तेथे शेती करणे शक्य नसल्याने वापराविना पडून आहे. 2002 ते 2005 दरम्यान  त्या जमिनींवर पवनचक्क्यांची उभारणी सुरु होती. याबाबत मूळ मालक अभिनज्ञ होते.शासकीय प्रकल्प म्हणून शेतकर्‍यांकडून त्याकडे काना डोळा करण्यात आला.तर अधिकार्‍यांकडून शासनाच्या हद्दीत सुरु असल्याचे  त्यावेळी  सांगण्यात आले.

 याचाच  गैरफायदा घेत व शासकीय अधिकार्‍यांना हाताशी धरुन खाजगी जमिन ही  वनविभागाची असल्याचा आभास करुन शेतकर्‍यांना देशोधडीला लावण्याचे कटकारस्थान रचून आमच्या जमिनींवर अतिक्रमण केल्याचा आरोप केला  आहे. महसूल दप्तरी रितसर कागदोपत्री खाजगी  मालकीच्या जमिनी असताना पवनचक्क्या उभ्या करताना मूळ मालकांना कसलीच पूर्वकल्पना दिली नाही, असा आरोप आहे.
 

 

 

 

tags : tarle,news, farmers, against ,windmills, in tarle,


  •