Thu, Jul 18, 2019 02:06होमपेज › Satara › गाव करी ते राव काय करील !

गाव करी ते राव काय करील !

Published On: Feb 08 2018 1:54AM | Last Updated: Feb 07 2018 10:58PMतारळे : एकनाथ माळी

गावच्या विकासासाठी गट-तट विसरून एकत्र येण्याचा पायंडा अखंड ठेवत तारळे ग्रामपंचायती अंतर्गत असलेल्या पांढरवाडी गावाने दोन अरुंद रस्ते रुंद करुन गाव करील ते राव काय करील याची प्रचिती दाखवून दिली आहे. तालुक्यातील इतर गावांनी याचा आदर्श घेऊन आपल्या गावचा विकास साधावा, अशी ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

तारळे — पाटण रस्त्यावर पांढरवाडी हे छोटेसे गाव असून त्याची लोकसंख्या सुमारे पाचशेच्या आसपास  आहे. गावाचे राजकारण देसाई - पाटणकर गटाभोवती फिरत असते. निवडणुकीपुरते राजकारण करत गावाने एकजुटीने एकत्र येत अनेक उपक्रम राबविले आहेत. ज्येष्ठ मंडळींच्या हातात हात घालून तरुण पिढीही गावच्या विकासासाठी एकत्र येतात ही गावासाठी भुषणावह बाब आहे. गावापासून जि. प. शाळा व शिवारात जाणारा रस्ता खाचखळग्यातून जात आहे. अरुंद रस्ता असल्यामुळे पावसाळ्यात शाळेत जाणारे विद्यार्थी व शिवारात जाणार्‍या शेतकर्‍यांची दैना होत आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून रस्ता दुरुस्तीची मागणी होत होती. नुकतीच आ. शंभुराज देसाई यांनी या रस्त्यासाठी दहा लाखांचा निधी मंजुर करुन रस्त्याचे भूमिपूजन केले.

पण सध्या रस्ता अरूंद आहे.त्यावर गावातील लोकांनी एकत्र येत सामंजस्याने रस्ता रुंदीकरण करण्यासाठी लगतच्या हिस्सेदारांनी सामंजस्याची भूमिका घेत जवळजवळ सोळा फूटाचा रस्ता मोकळा केला आहे. पाचशे  मिटरपर्यंत रस्ता रुंद केला आहे. यामुळे विद्यार्थ्यांसह शिवारात जाणार्‍या शेतकर्‍यांची सोय होणार आहे. गावच्या विकासासाठी उपयूक्त ठरणार्‍या रस्त्यासाठी गावाची एकी महत्त्वाची असल्याचे पांढरवाडीच्या ग्रामस्थांनी दाखवून दिले आहे.

त्याचबरोबर मारुती मंदिर ते मातंग वस्तीकडे जाणारा रस्ता सुद्धा अरुंद होता. हा रस्ता आता दहा फूट होणार आहे. अनेक वर्षांपासूनचा रस्त्याचा प्रश्‍न निकाली निघाला आहे.  हे केवळ एकीमुळे साध्य झाले आहे.