Mon, May 27, 2019 07:47होमपेज › Satara › कडक उन्हाने अंगाची लाहीलाही

कडक उन्हाने अंगाची लाहीलाही

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

तरडगाव : प्रतिनिधी

गेल्या काही दिवसांपासून कडाक्याचे उन्हामुळे अंगाची लाहीलाही होऊ लागली आहे. त्यामुळे थंडावा मिळण्यासाठी नागरिकांची पावले शीतपेय व रसवंतीगृहांच्या दिशेने वळू लागली आहेत. उन्हाळा तीव्र झाल्यापासून लोणंद फलटण रस्त्यांवर ठिकठिकाणी थंड पेय विक्रेत्यांचे ठेले लागले आहेत. तरडगाव पालखी स्थळापाशी एकाने तर चक्क मंडप टाकूनच थंडगार कलिंगड व लिंबू सरबत उपलब्ध केले आहे. ठिकाठिकाणी असलेल्या विक्रेत्यांकडे थंडावा मिळण्यासाठी नागरिक गाड्या थांबवत आहेत. 

तीव्र उकाड्याचा अंदाज घेवूनच नागरिक बाहेरगावी जाण्यासाठी बाहेर पडत आहेत. काहीजण डोक्यावर टोप्या घेत आहेत. बसस्थानक परिसरांतूनही लोक गाड्या येईपर्यंत सावली मिळेल तिथे निवारा शोधत आहेत. लग्न सराई सुरु असल्याने एखादा पाहुणा लग्न पत्रिका घरी घेऊन आला की, गृहीणी चहा ऐवजी लिंबू सरबत किंवा थंड पेयच देत आहेत. सामाजिक संघटनांनीही थंड पाण्याचे माठ किंवा रांजण ठिकठिकाणी भरून पाणपोई उपलब्ध केली आहे. फ्रीजमध्ये ठेवलेली पेप्सी आणि ताकापासून बनविलेली ताकवडीला बालचमूंची अद्यापही मोठी पसंती आहे.  थंड पेय उपलब्ध व्हावेत म्हणून मंगल कार्यालये आणि लग्न सोहळ्याच्या ठिकाणीही थंड पेय विक्रेते सकाळपासून संध्याकाळपर्यंत थांबत आहेत. उकाडा सुसह्य करण्यासाठी प्रत्येकजण आपपल्या परीने उपाय करताना दिसत आहे. 
 


  •