Thu, May 28, 2020 10:40होमपेज › Satara › तांबवेचा जुना कोयना पूल कोसळला

तांबवेचा जुना कोयना पूल कोसळला

Published On: Aug 14 2019 11:24PM | Last Updated: Aug 14 2019 10:47PM
कराड : प्रतिनिधी

दैनिक ‘पुढारी’ने आवाज उठवल्यानंतर वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला तांबवे पूल बुधवारी पहाटे दगडी पिलर खचल्याने अखेर कोसळला. अतिवृष्टीसह कोयना नदीला आलेल्या महापुराच्या तडाख्यामुळे धोकादायक बनलेल्या या पुलाचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळेच 30 जुलैला वाहतूक बंद करत या पुलाचे स्ट्रक्‍चरल ऑडिट करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता; मात्र तत्पूर्वीच हा पूल पडल्याने परिसरातील सुमारे 12 गावांच्या दळणवळणाचा प्रश्‍न गंभीर बनला आहे.

1981 पासून वाहतुकीसाठी खुला असलेला तांबवे पूल पाच वर्षांपूर्वीच धोकादायक बनला होता. त्यामुळे दैनिक पुढारीने त्याबाबत पाठपुरावा केल्याने बांधकाम खात्याने या पुलावरून होणारी अवजड वाहतूकही रोखली होती. मात्र परिसरातील विशेषतः तांबवेतील लोकांची गैरसोय लक्षात घेत बांधकाम खात्याने पुलाच्या सुरूवातीला लावलेले लोखंडी खांब काढून या पुलावरून अवजड वाहनांची वाहतूक सुरू करण्यात आली होती. एकीकडे अशी स्थिती असताना 28 जुलैला कराडमधील जुना कृष्णा पूल पडला. त्याचवेळी तांबवेतील एका युवकाने तांबवे पुलाच्या पश्‍चिमेकडील दोन नंबरच्या दगडी पिलरचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल केले होते. हा पिलर पूर्णपणे भेंगाळला होता आणि हे छायाचित्र 24 जुलैचे असल्याचा दावा संबंधित युवकाने केला होता.

त्यामुळेच ‘दैनिक पुढारी’ने धोकादायक पुलावरून गेली पाच वर्ष वाहतूक सुरू असल्याकडे लक्ष वेधत कोकणातील सावित्री पुलासारखी दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त करत याबाबत 29 जुलै रोजी आवाज उठवला होता. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने तीन ते चार तासातच हा पूल बंद करण्याचा निर्णय घेत प्रत्यक्ष कार्यवाही केली होती. प्रांताधिकारी हिंमत खराडे यांनीही तांत्रिक विभागाच्या पाहणीनंतर पुलाबाबत प्राप्‍त होणारा अहवाल विचारात घेऊन पुलावरून वाहतूक सुरू करायची अथवा नाही ? याचा निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगितले होते.

30 जुलैनंतर पावसाचा जोर वाढल्याने तांबवे पूल पाण्याखाली गेला होता. हा पूल पूर ओसरल्याने दोन दिवसापूर्वीच खुला झाला होता. मात्र पुरामुळे पुलाची मोठी हानी झाली होती. संरक्षक जाळ्याही तुटून गेल्या होत्या. त्यामुळेच अगोदरपासून धोकादायक असणारा तांबवे पूल अखेरच्या घटका मोजत होता. अखेर बुधवारी पहाटे पाच ते सहा या वेळेत तांबवे गावच्या बाजूचा दोन नंबरचा दगडी पिलर खचला आणि पूल पडला. घटनेची माहिती मिळताच पडलेला पूल पाहण्यासाठी परिसरातील लोकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. दरम्यान, तांबवेसह उत्तर तांबवे, दक्षिण तांबवे, आरेवाडी, गमेवाडी, किरपे, डेळेवाडी, पाठरवाडी, साजूर, गारवडे, बहुले या गावातील लोकांचा दळणवळणाचा प्रश्‍न गंभीर बनला असून या लोकांना आता पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे.