Mon, May 27, 2019 07:00होमपेज › Satara › तमाशा जगणार्‍याच्या आयुष्याचा ‘तमाशा (video)

तमाशा जगणार्‍याच्या आयुष्याचा ‘तमाशा (video)

Published On: Feb 04 2018 11:20AM | Last Updated: Feb 04 2018 12:07PMकराड : अशोक मोहने

नाटक, चित्रपट सृष्टीतील कलाकार हाय प्रोफाईल जीवन जगत असताना अडगळीत पडलेल्या  तमाशा कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. ज्येष्ठ तमाशा कलावंत रामचंद्र बनसोडे करवडीकर यांच्या निधनानंतर या कुटुंबाला  भेटण्यासाठी आलेले तळबीड  येथील पोपट यदू वाघमारे व त्यांचे  धाकटे बंधू आबा वाघमारे या तमाशा कलावंतांच्या आयुष्याचे भयान वास्तव समोर आले. 6 दशकाहून अधिक काळ तमाशा रंगभूीची इमाने इतबारे सेवा करणार्‍या या  वाघमारे बंधूंच्या आयुष्याचा शेवटचा प्रवास अत्यंत खडतर आणि वेदनादायी सुरू आहे.

1972 पासून वाघमारे बंधू तमाशात  काम करत होते. विठाबाई भाऊ नारायणगावकर या तमाशा फडात कारकिर्दिची सुरूवात करताना त्यांनी आपल्या अदाकारीने रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. 16 वर्षे त्यांनी तेथे काम केले.  नंतर मंगला बनसोडे करवडीकर या तमाशा मंडळातही या जोडीने शाब्दीक कोट्या करत प्रेक्षकांना खळखळून हसवले. ज्येष्ठ तमाशा कलावंत व प्रसिध्द वगनाट्य लेखक रामचंद्र बनसोडे यांच्या सोबत  त्यांनी 16 वर्षे काम केले. यानंतर काळू  -बाळू तमाशात 5 वर्षे, रघुवीर खेडकर 9 वर्षे, गणपतराव माने 5 वर्षे,  दत्ता महाडीकमध्ये 3 वर्षे यासह लहान मोठ्या तमाशा फडात काम केले.  

आयुष्यातील साठ वर्षे रंगभूमीची इमाने इतबारे सेवा करणार्‍या आणि तमाशात महाराज, प्रधानजी यासह प्रमुख भूमिका साकारणार्‍या या वाघमारे बंधूवंर आज मात्र उपासमारीची वेळ आली आहे. वार्धक्याने शरीर साथ देत नसल्याने तमाशाचा फड सुटला आणि त्यांच्या नशिबी मरणाचे भोग सुरू झाले, ते आजही सुरूच आहेत. पोटाची खळगी भरण्यासाठी या वाघमारे बंधूंना मोल मजुरी करून दिवस ढकलावे लागत आहेत.आबा वाघमारे यांचा मजुरी करताना एक हात दुखावला आहे. त्यावर औषधोपचार करण्यासही त्यांच्याकडे पैसे नाहीत. पोटाचा प्रश्‍न आवासून समोर आहेच.  आजारपण, थकलेले शरीर  घेऊन जमेल तसे काम करून ते जीवन जगत आहेत. लोक थोडी मदत करतात, कधी पोटाला देतात असा आयुष्याचा खडतर प्रवास त्यांचा सुरू आहे.

शासन दरबारी त्यांचा कलावंतांसाठीचा पेन्शनचा अर्जही वर्षानुवर्षे धूळ खात पडून  आहे. आयुष्यभर कलेची सेवा करूनही पेन्शन योजना त्यांच्यापर्यंत पोहचलीच नाही. परवा ज्येष्ठ तमाशा कलावंत व वगनाट्य  लेखक रामचंद्र बनसोडे  यांचे निधन झाले. त्यांच्या कुटुंबाची  भेट घेण्यासाठी वाघमारे कुटुंब करवडी येथे आले होते. त्यावेळी त्यांनी आयुष्याची परवड सांगितली. जर्जर झालेले शरीर, रापलेला चेहरा आणि अंगावरील फाटलेले कपडे अशी त्यांची दयनिय परिस्थिती पाहून अनेकांचे मन खिन्न झाले.  येथे येण्यासाठी गाडीभाड्यालाही त्यांच्याकडे पैसे नव्हते. शेवटी मंगला बनसोडे यांनी त्यांना परतीच्या गाडीभाड्याला पैसे दिल्यानंतर उपेक्षेचं दु:ख गाठीला बांधून त्यांनी गाव गाठले. कराड तालुक्यात बहुतेक तमाशा कलावंत हेच दु:ख भोगत आहेत. बहुरूपी, वासुदेव, नंदीबैलवाले, पिंगळे, पोतराज  या कलावंतांची परिस्थिती याहून वेगळी नाही. 

कलावंतांना शासनाचे प्रतिमहिना 300 रूपये मानधन मिळत होते. ते नंतर दिड हजारापर्यंत गेले. पण गेल्या दिड वर्षांपासून ते मानधनही शासनाने बंद केले आहे. वय झाल्याने मजुरी करता येत नाही.  बारीक सारीक कामे करून पोट भरायचे. माझ्या प्रमाणे अनेक कलावंतांसमोर पाटोचा प्रश्‍न  आवासून उभा आहे, मायबाप सरकारने मानधन सुरू करावे, अशी आर्जव पोपट वाघमारे यांनी ‘पुढारी’शी बोलताना केली.