Sun, Jul 21, 2019 16:51
    ब्रेकिंग    होमपेज › Satara › वाळू तस्करांकडून तलाठ्याला मारहाण

वाळू तस्करांकडून तलाठ्याला मारहाण

Published On: Jan 08 2018 1:16AM | Last Updated: Jan 07 2018 9:06PM

बुकमार्क करा
खटाव : प्रतिनिधी 

महसूल न भरता अवैधरित्या वाळूची वाहतूक करणारा डंपर अडविल्याच्या कारणावरुन सचिन राजगे याने कटगुणचे तलाठी किरण पवार यांना मारहाण केली. डंपर चालकाने अधिकार्‍याच्या अंगावर डंपर घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी सचिन राजगेसह डंपर चालक वलेकर व अज्ञात व्यक्तीच्या विरोधात पुसेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.   

अवैध वाळू वाहतूक रोखण्याकरीता मंडल अधिकारी व तलाठी यांचे पुसेगाव, बुध, खटाव मंडलामध्ये शुक्रवारी रात्रीपासून पेट्रोलिंग सुरु होते. मंडल अधिकारी विठ्ठल तोरडमल व तलाठी किरण पवार यांनी वर्धनगड बसस्टॉपपासून थोड्या अंतरावर शनिवारी सकाळी  साडेपाच वाजण्याच्या सुमारास पुसेगाव बाजूकडून व कोरेगावच्या दिशेने जाणारा डंपर (एम. एच. 11 बी. डी 76) रोखला. चालक वलेकर याच्याकडे वाळूची महसूली पावती व वाहतूक परवान्याची विचारणा केली असता डंपर चालक वलेकर याने वाळू पावती व परवाना नसल्याचे सांगितले. हा प्रकार सुरु असतानाच पाठीमागून काळ्या रंगाची फॉर्च्युनर (एम. एच. 11, 111) मधून सचिन राजगे व 35 ते 40 वर्षाची एक अनोळखी व्यक्ती त्याठिकाणी आले. हा सर्व प्रकार डंपर चालकाने राजगे यास सांगितला.

मंडल अधिकारी तोरडमल यांनी वाळूचा डंपर पुसेगाव पोलीस ठाण्यात घ्या, असे चालकाला सांगितले. त्यावेळी घाटात डंपर वळणार नाही, वर्धनगड घाट उतरल्यावर डंपर वळवून घेऊ असे चालकाने सांगितले. तलाठी पवार यांची चारचाकी डंपरच्या मागे तर सचिन राजगे याची गाडी तलाठी किरण पवार यांच्या चारचाकीच्यामागे होती. अचानक डंपर चालकाने कोरेगाव बाजूकडे असलेल्या वीट भट्टीकडे जाणार्‍या रोडवर वाळूचा डंपर वळविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मंडल अधिकारी तोरडमल व तलाठी किरण पवार हे चारचाकीतून तत्काळ खाली उतरले.

त्याचवेळी डंपर चालकाने डंपरमधील वाळू खाली केली. डंपर घेऊन तो पळून जाणार असे लक्षात येताच मंडल अधिकारी तोरडमल व तलाठी किरण पवार यांनी डंपरच्या समोर उभे राहून त्याला अडविण्याचा प्रयत्न केला. सचिन राजगे याने सर्वांच्या अंगावर डंपर घालण्यास डंपर चालकाला सांगितले. त्यानुसार चालकाने मंडल अधिकारी व तलाठी यांच्या अंगावर डंपर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी भितीने ते बाजूला सरले आणि त्या संधीचा फायदा घेत डंपर चालक कोरेगावच्या दिशेने डंपर घेऊन पसार झाला.

सचिन राजगे याने भर रस्त्यामध्ये तलाठी किरण पवार यांना डंपरवर का कारवाई करतायं? याचा जाब विचारत धक्काबुक्की करुन मारहाण केली तसेच सरकारी कामात अडथळा केला. याप्रकरणी तलाठी किरण पवार यांनी सचिन राजगे, चालक वलेकर व अज्ञात व्यक्तीच्या विरोधात पुसेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास सहायक पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड करीत आहेत. 

तहसीलदारांच्या आदेशाने गुन्हा नोंद

घडलेल्या घटनेची माहिती तहसीलदार सुशिल बेल्हेकर यांना कळताच त्यांनी तातडीने पुसेगावला जावून मंडल अधिकारी व सर्व तलाठी यांच्याकडून घटनेची माहिती घेऊन संबंधितांवर कायदेशीररित्या गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले.