Fri, Apr 26, 2019 03:56होमपेज › Satara › वांगनदी पात्रावर वाळू माफियांची वक्रदृष्टी

वांगनदी पात्रावर वाळू माफियांची वक्रदृष्टी

Published On: Jan 17 2018 2:04AM | Last Updated: Jan 16 2018 8:09PM

बुकमार्क करा
तळमावले : वार्ताहर

पाटण तालुक्यातील  वाल्मिकी पठारावरती उगम पावलेल्या वांग नदीवरती छोटी छोटी धरणे आणि कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत. यामुळे वाल्मिकी खोर्‍याचे नंदनवन झाले आहे. मात्र, वांग नदीवर वाळू माफियांची वक्रदृष्टी पडली आहे. वांगनदीची सुटका करण्यासाठी महसूल विभागाने जागे होऊन कारवाई करणे गरजेचे आहे. शासनाने वाळू उपशावर सगळीकडे बंदी आणल्यामुळे कृष्णा व कोयना नदीपात्रातील वाळू उपशावर पूर्णपणे बंदी आली आहे. त्यामुळे अवैध वाळू उपसा करणारे वांगनदी पात्रामध्ये वाळू उपसा करण्यासाठी येऊ शकतात. यासाठी संबंधित महसूल विभागाच्या अधिकार्‍यांनी डोळ्यामध्ये तेल घालून लक्ष ठेवणे गरजेचे  आहे.

अन्यथा वांगनदीचे ‘झकास पात्र भकास’ झाल्याशिवाय राहणार नाही. काही दिवसांपूर्वी पाटण नजीक अवैध वाळू उपसा सुरू होता. तसाच प्रकार वांग नदीपात्रामध्येही सुरु होता. काही ठिकाणी कारवाई झाल्यामुळे काही अंशी हे प्रमाण कमी झाले. हा अवैध वाळू उपसा पुन्हा सुरु होऊ नये म्हणून संबंधित विभागाने योग्य ती खबरदारी घ्यावी. अशी मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे. वांगनदीचे पात्र पाटण तालुक्यातील ढेबेवाडी खोर्‍यामध्ये विस्तृत प्रमाणात आहे. तसेच पुढे जाऊन ही नदी मालदन, गुढे, खळे, साईकडे, काढणे, या गावातून  कराड तालुक्यातील कोळे आणे, येणके, पोतले या गावामधून येरवळे नजीक कोयना नदीस जाऊन मिळते. अशा या वांग नदीच्या पात्राचा लाभ कराड तालुक्यापेक्षा पाटण तालुक्यास सर्वात जास्त होतो. सर्वत्र वाळू उपशावर बंदी  आहे. 

या पूर्वी वांग नदीपात्रातून कधीही मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा झालेला  नव्हता. परंतु सगळीकडे बंदी असल्याने या वाळू माफियांनी आपला मोर्चा वांग नदीकडे वळवला आहे. वाळू उपसा झाल्यानंतर मोठ्याप्रमाणात खड्डे पडत आहेत. त्यामध्ये एखादी दुर्घटना घडल्यास संबंधित वाळू उपसा करणार्‍यांना आणि महसूल विभागाच्या संबंधित अधिकार्‍यांना जबाबदार धरण्यात यावे. अशी मागणी तळमावले, ढेबेवाडी विभागातील नागरिकांनी केली आहे.