तळमावले : वार्ताहर
बामणवाडी (कुंभारगाव) ता. पाटण येथे बुधवारी रात्री पाळीव कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केल्यामुळे कुंभारगाव विभागामध्ये भितीचे वातावरण तयार झाले आहे. कुंभारगाव विभागामध्ये अशा प्राण्यांवर हल्ला करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही शेळ्यांच्या वर आणि कुत्र्यांच्यावर बिबट्याने हल्ला केला होता. यावरून असे लक्षात येते की वनविभागाने यामधून कोणताही धडा घेतलेला नाही. बामणवाडी येथील घटनेमुळे पाळीव प्राणी सुरक्षित नाहीत असेच म्हणावे लागेल.
नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार बाबुराव पांडुरंग पवार रा.बामणवाडी यांच्या मालकीचा हा कुत्रा होता. दिलीप खिचडे यांच्या घरासमोर बिबट्याने हल्ला केला हे घर गावाच्या मध्यभागी आहे. मानवी वस्तीमध्ये बिबट्याचा वावर वाढला आहे. पाळीव प्राण्यांवर हल्ला करणारा बिबट्या माणसांवरही हल्ला करु शकतो. एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी वनविभागाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. कुंभारगाव विभागातील पोतेकरवाडी, बामणवाडी, पडवळवाडी, माटेकरवाडी, वायचळवाडी ही गावे डोंगरालगत आहेत.
येथील नागरिकांच्यामध्ये भितीचे वातावरण तयार झाले आहे. काही महिन्यांपूर्वी पोतेकरवाडी येथे डोंगरावर चरण्यासाठी गेलेल्या शेळीवरती बिबट्याने हल्ला केला होता. अशा घटना वारंवार घडल्यास शेतकर्यांना डोंगरालगतच्या शेतामध्ये जाणेही मुश्किल होणार आहे. वनविभागाने वेळीच दक्षता घेणे आवश्यक आहे