Tue, Jun 18, 2019 23:19होमपेज › Satara › तळमावले-ढेबेवाडी पार्किंगचे वाजले तीनतेरा

तळमावले-ढेबेवाडी पार्किंगचे वाजले तीनतेरा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

तळमावले : वार्ताहर

तळमावले ता. पाटण येथे काही महिन्यापूर्वी वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी तळमावले-ढेबेवाडी रस्त्यावर समविषम पार्किंग करण्याचा निर्णय घेण्यात आला. व्यापारी तसेच स्थानिकांनी या निर्णयाचे स्वागत केले. पोलिस प्रशासनाने या पार्किंग संदर्भात व्यापार्‍यांना आणि नागरिकांना सुचना दिल्या. तसेच जनजागृती देेखील करण्यात आली. सम आणि विषम तारखेनुसार पार्किंग करण्याचे ठरवण्यात आले. काही दिवस पोलिसांकडुन नियम मोडणार्‍यांवर कारवाई देखील झाली. परंतु नव्याचे नऊ दिवस म्हणीप्रमाणे या पार्किंगची सद्या अवस्था झाली आहे.

 तळमावले मधील समविषम पार्किंगचे तीनतेरा वाजले आहेत असेच म्हणावे लागेल. कारण काही नागरिक समविषम पार्किंगचा नियम विसरले आहेत. तर काही नागरिक  कोठेही आपली वाहने उभी करीत आहेत. त्यामुळे या समविषम पार्किंगचा बट्ट्याबोळ झाला आहे यात काही शंका नाही.  समविषम पार्किंग संदर्भातील पोलीसांचा चांगलाच धसका रोडरोमिओंनी घेतला होता. कारवाईच्या भितीने तेही नियमांचे पालन करीत होते. परंतु आता चित्र उलटे दिसते आहे. हे रोडरोमिओं सैराट झाल्यासारखे आपल्या दुचाकी कोठेही पार्क करीत आहेत. तळमावले ही बाजारपेठ नेहमी गजबजलेली बाजारपेठ असते. कराड ढेबेवाडी रस्ता रुंद झाल्यामुळे वाहनांचा वेग वाढला आहे.

कोठेही पार्क केलेल्या वाहनांमुळे अपघात होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. यासाठी समविषम पार्किंगची आवश्यकता आहे. नाईकबाच्या यात्रेनिमित्त पार्किंगचा हा नियम थोडा शिथील केला असला तरी  नाईकबाची यात्रा झाली आहे. त्यामुळे पुन्हा समविषम पार्किंग संदर्भात पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घेऊन पूर्वीसारखा नियम तोडणार्‍यांवर कारवाईचा बडगा उगारावा. अशी मागणी तळमावले विभागातील नागरिकांनी केली आहे.
 

 

 

 

tags: talamavale, Dhebewadi,news, Parking, on, street, even, odd,


  •