Sat, Apr 20, 2019 08:28होमपेज › Satara › सातारा : सिव्हिलमध्ये संशयितांचा ‘लुंगी’ डान्स (video)

सिव्हिलमध्ये संशयितांचा ‘लुंगी’ डान्स (video)

Published On: Jan 21 2018 11:25PM | Last Updated: Jan 22 2018 1:22AMसातारा : टीम पुढारी

सुरुचि राडा प्रकरणातील अटकेत असलेले दोन्ही गटांतील संशयित आरोपी जेलमध्ये न जाता छातीत दुखत असल्याचे कारण सांगून जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. यापैकी काही  संशयित रुग्णांनी मात्र जामीन मिळताच रुग्णालयात चक्क ‘लुंगी’ डान्स केला. सुमारे 15 मिनिटे सिव्हिलच्या आवारात बेधुंदपणे त्यांचा हा जल्लोष सुरू राहिल्यामुळे सिव्हिलच्या प्रिझन वॉर्डचा अक्षरश: डान्स बारच झाला. याबाबतचा व्हिडीओही ‘पुढारी’ने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमुळे व्हायरल झाला आहे.

सुमारे साडेतीन महिन्यांपूर्वी आनेवाडी टोल नाकाप्रकरणी सातार्‍यात सुरुचि बंगल्याबाहेर जोरदार धुमश्‍चक्री झाली होती. यावेळी खा. उदयनराजे भोसले व आ. शिवेंद्रराजे भोसले यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याने तोडफोड व फायरिंगसारखी घटना घडल्याने खळबळ उडाली होती.  आनेवाडी टोल नाक्यावरही त्याचे पडसाद उमटले होते. सातार्‍याचे तर अक्षरश: बिहार करून टाकले होते. याप्रकरणी दोन्ही गटांतील 100 हून अधिक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले. शाहूपुरी पोलिस ठाण्यात तीन तक्रारी दाखल झाल्यानंतर दोन्ही गटांतील  कार्यकर्त्यांची धरपकड करुन अटकही करण्यात आली होती.    

अटकेनंतर जिल्हा व उच्च न्यायालयात दोन्ही राजे गटातील संशयितांच्यावतीने जामीनासाठी अर्ज दाखल करण्यात आले होते. शनिवार दि. 20 रोजी आ.शिवेंद्रराजे भोसले गटाच्या आठ समर्थकांना जामीन मिळाला. अटकेतील काही संशयित जिल्हा शासकीय रुग्णालयातील प्रिझन वॉर्डमध्ये छातीमध्ये दुखत असल्याचे कारण सांगून उपचारासाठी दाखल होते. त्यातील काही जणांना जामीन मिळाल्यामुळे छातीत दुखत असणार्‍या या संशयित रुग्णांचा अचानक नूरच पालटला. त्यांनी चक्क जल्लोष करायला सुरुवात करुन लुंगी डान्सचा  ताल धरला.

एकीकडे आमदार गटाचे समर्थक जामीन मंजूर झाल्याने खुशीत असताना त्यांच्यामध्ये चक्क खासदार गटाचे समर्थकही सामील झाले. संशयितांनी ‘हिप हिप हुर्रे’ करत लुंगी डान्सवर बेभानपणे ताल धरला. हे नाचगाणे चांगलेच रंगले होते. सुमारे दहा ते पंधरा मिनिटे हा प्रकार सुरु होता.  अखेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंर हा प्रकार थांबला. शनिवारी रात्री उशीरा ही घटना घडली असून दोन्ही कार्यकर्ते एकमेकांच्या गळ्यात गळे घालून नाचल्याने त्याबाबत शहरात जोरदार चर्चा सुरु होती.

‘पुढारी’ने या सार्‍या प्रकाराचे स्टिंग ऑपरेशन करुन या लुंगी डान्सचा व्हिडीओ लोकांसमोर आणला आहे.  अवघ्या चोवीस तासात ‘पुढारी’ने  हे दुसरे स्टिंग ऑपरेशन करुन व्हिडीओ  व्हायरल केला आहे. पोलिसांची खाबुगिरी चव्हाट्यावर आणणारा व्हिडीओ कालच ‘पुढारी’ने समोर आणल्यानंतर सिव्हीलमधील संशयितांच्या तथाकथीत आजाराचा पर्दाफाश करणार्‍या या  दुसर्‍या व्हिडीओने खळबळ उडवून दिली आहे.

...यांना रुग्ण म्हणायचे तरी कसे?

सिव्हिलमधील संशयित रुग्णांचा लुंगी डान्स पाहून यांना रुग्ण म्हणायचे तरी कसे? असा प्रश्‍न उपस्थितांनी केला असून, या प्रकाराची सातार्‍यात जोरदार चर्चा सुरू आहे. एकीकडे सर्वसामान्यांमधील संशयितांना अटकेनंतर पोलिसी खाक्या अनुभवयाला मिळत असताना, दुसरीकडे प्रतिष्ठित व बड्यांच्या संशयितांना मात्र आजाराचा बहाणा करून अटकेनंतरही सिव्हिलमध्ये ऐशआरामी जीवन जगायला मिळत असल्याचे वास्तव आहे. ‘पुढारी’च्या  स्टिंग ऑपरेशनमुळे हा दुजाभावही समोर आणला आहे.

प्रिझन वॉर्डमध्ये पोलिसांकडून झाडाझडती

सिव्हिलच्या प्रिझन वॉर्डमध्ये राडा प्रकरणातील संशयित आरोपींचा बेफान डान्स झाल्याचे वृत्त समोर आल्यानंतर या प्रकरणाची सातारा पोलिसांनी गंभीर दखल घेतली. पोलिसांनी एका पथकाद्वारे संशयितांची झाडाझडती घेतली. त्यांनी अचानक प्रिझन वॉर्डमध्ये धडक मारल्यानंतर संशयित आरोपी गांगरून गेले. न्यायालयीन कोठडीत असताना या संशयितांकडे मोबाईल असल्याचा पोलिसांचा कयास होता. त्यानुसार पोलिस संशयितांची तपासणी करत होते.  या झाडाझडतीबाबत पोलिसांनी कमालीची गोपनीयता बाळगली होती.