Fri, Jul 19, 2019 17:43होमपेज › Satara › कोर्टात पेनड्राईव्ह, अहवाल सादर

कोर्टात पेनड्राईव्ह, अहवाल सादर

Published On: Jan 25 2018 1:01AM | Last Updated: Jan 24 2018 10:22PMसातारा : प्रतिनिधी

सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयातील प्रिझन वॉर्डमध्ये संशयित आरोपींच्या लुंगी डान्सप्रकरणी बुधवारी पोलिसांनी न्यायालयात पेनड्राईव्ह, अहवाल सादर करत संशयितांना जामीन न देण्याची मागणी केली. तर दुसरीकडे लुंगी डान्सप्रकरणी कोणताही गुन्हा दाखल नसल्याने संशयितांना जामीन दिला जावा, अशी मागणी बचाव पक्षाने केली. दरम्यान, संशयितांचा जामीन लांबला असून गुरुवारी त्याच्यावर पुढील सुनावणी होणार आहे.

दै.‘पुढारी’ने तीन दिवसांपूर्वी प्रिझन वॉर्डमध्ये संशयित आरोपी रुग्णांचा लुंगी डान्स झाल्याची व्हिडीओ क्‍लिप  व्हायरल करून पोलखोल केली. या घटनेनंतर जिल्ह्यासह राज्यात  खळबळ उडाली. ‘पुढारी’तील वृत्तानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी पोलिसांना प्रिझन वॉर्डमध्ये छापा टाकायला सांगितल्यानंतर तेथून मोबाईल, पॉवर बँक, कॅरम व सिगारेट जप्‍त करण्यात आल्या. प्रिझन वॉर्डच्या बाहेर पोलिसांचा बंदोबस्त असतानाही मोबाईलसह इतर वस्तू आतमध्ये कशा गेल्या? असा सवाल उपस्थित केल्यानंतर पोलिस अधीक्षकांनी एका पोलिस हवालदाराला निलंबित करुन इतर तीन पोलिसांच्या चौकशीला सुरुवात केली.

दरम्यान, लुंगी डान्सप्रकरणी तपासी अधिकारी राजलक्ष्मी शिवणकर यांना अहवाल करुन तो न्यायालयात सादर करण्याचे आदेश झाल्यानंतर बुधवारी त्यांनी तो अहवाल न्यायालयात सादर केला. यावेळी पोलिस व सरकारी पक्षाने न्यायालयात युक्‍तिवाद केला. संशयित आरोपींनी सिव्हील हॉस्पिटलच्या प्रिझन वॉर्डमध्ये मोबाईल वापरुन डान्स केला आहे. त्यानंतर त्या डान्सची क्‍लीप व्हायरल केल्याने समाजात चुकीचा संदेश गेला आहे. संशयितांच्या या कृत्यामुळे त्यांना कायद्याचा धाक नसल्याचे समोर  येत आहे. क्‍लीप पाहिल्यानंतर त्यांना कोणताही आजार नसल्याचे निदर्शनास येत आहे. हा सर्व प्रकार बघितल्यानंतर हे सर्व संशयित जामीन मिळाल्यावरही कायद्याने वागतील, असे वाटत नाही. यामुळे त्यांना जामीन दिला जावू नये, अशी मागणी करुन 1 पेनड्राईव्ह व कागदपत्रे न्यायाधिशांना दिली.

सरकार पक्षाचा युक्‍तिवाद झाल्यानंतर बचाव पक्षानेही युक्‍तिवाद करत सरकार पक्षाच्या युक्‍तिवादावर हरकत घेतली. लुंगी डान्सप्रकरणी ज्याने शुटींग केले आहे त्याच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई झालेली नाही. तसेच ज्याने शुटींग केले आहे त्याचा जबाबही पोलिसांनी घेतला नाही. सुरुचि घटनेच्या जामीनाचा व या घटनेचा काहीही संबंध नाही.  याप्रकरणी पोलिसांनी स्वतंत्र गुन्हा दाखल केला नसल्याने संशयितांना जामीन व्हावा, अशी मागणी करण्यात आली.

दोन्ही पक्षाचा युक्‍तिवाद झाल्यानंतर न्यायाधिशांनी गुरुवारी याबाबत पुढील सुनावणी होणार असल्याचे सांगितले. यामुळे आता आज जामीनाबाबत कोणता फैसला होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सहा जणांचा जामीन लटकला..

सुरुची राडाप्रकरणी चार्जशीट दाखल झाल्याने खासदार व आमदार गटाच्या वतीने जामिनासाठी जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. आमदार गटाला जामीन झाल्यानंतर त्या खुशीच्या माहोलात खासदार समर्थकांनी प्रिझन वॉर्डात लुंगी डान्स केला. दरम्यानच्या काळात शनिवारीच खासदार गटाच्या कार्यकर्त्यांच्या जामीन अर्जावरही सुनावणी झाल्याने सोमवारी त्याची पुढील सुनावणी होती; मात्र तोपर्यंत लुंगी डान्स बाहेर आल्याने जामिनाच्या प्रक्रियेला ब्रेक लागला. युक्‍तिवादाची प्रक्रिया झाली असताना लुंगी डान्समुळे पुन्हा न्यायालयात दोन्ही बाजूंनी युक्‍तिवाद झाला.