Sun, Jan 20, 2019 06:09होमपेज › Satara › खासदार उदयनराजे, आमदार शिवेंद्रराजेंना जामीन

खासदार उदयनराजे, आमदार शिवेंद्रराजेंना जामीन

Published On: Apr 26 2018 2:04AM | Last Updated: Apr 25 2018 10:39PMसातारा : प्रतिनिधी

सातार्‍यात कोजागरी पौर्णिमेला झालेल्या सुरुची राडाप्रकरणी खा. उदयनराजे भोसले व आ. शिवेंद्रराजे भोसले या दोन्ही नेत्यांना बुधवारी सातारा जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला. दरम्यान, सरकार पक्षानेही दोन्ही नेत्यांच्या जामिनास हरकत घेतली नसल्याने जामिनाचा मार्ग मोकळा झाला.

आनेवाडी टोलनाक्याच्या ठेक्यावरून सहा महिन्यांपूर्वी खा. उदयनराजे व आ. शिवेंद्रराजे यांच्या गटांत सुरुची बंगल्यासमोर मध्यरात्री राडा झाला होता. दोन्ही गट एकमेकांसमोर आल्यानंतर परिसरातील गाड्यांची तोडफोड झाली होती. या अभूतपूर्व राड्यातच फायरिंगची घटना घडल्याने परिसर हादरून गेला होता. याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात एकूण तीन तक्रारी दाखल आहेत. यामध्ये पोलिसांनी खा. उदयनराजेंसह त्यांच्या समर्थकांवर व आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह त्यांच्या समर्थकांवर तसेच दोन्ही गटांतील कार्यकर्त्यांनी परस्पर तक्रारी दाखल केल्या आहेत. गुन्हे दाखल झाल्यानंतर दोन्ही गटांतील समर्थक सुरुवातीला पसार झाले. सुमारे 20 जणांना अटक झाल्यानंतर उर्वरित संशयितांनी मुंबई उच्च न्यायालय व जिल्हा न्यायालयात धाव घेऊन जामीन घेतले.

कार्यकर्त्यांची जामिनाची प्रक्रिया झाल्यानंतर खा. उदयनराजे व आ. शिवेंद्रराजे यांनी सातारा जिल्हा न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. बुधवारी त्याबाबत सुनावणी होती. दोन्ही पक्षांचा युक्‍तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने जामीन मंजूर केला. रात्री उशिरापर्यंत जामिनाची ऑर्डर झालेली नव्हती. खा. उदयनराजे गटाच्या वतीने अ‍ॅड. धैर्यशील पाटील, अ‍ॅड. ताहीर मणेर, अ‍ॅड. संदेश कुंजीर, तर आ. शिवेंद्रराजे गटाच्या वतीने अ‍ॅड. एम. टी. यादव, अ‍ॅड. पराग जाधव यांनी काम पाहिले.