Wed, Sep 19, 2018 08:37



होमपेज › Satara › खासदार समर्थकांना जामीन

खासदार समर्थकांना जामीन

Published On: Jan 26 2018 1:16AM | Last Updated: Jan 26 2018 8:43AM



सातारा : प्रतिनिधी

सुरुचि राडा प्रकरणातील खासदार गटाच्या सहा जणांचा गुरुवारी जामीन मंजूर झाला असून, यामुळे कार्यकर्त्यांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला. लुंगी डान्स प्रकरणामुळे गेली तीन दिवस याप्रकरणी जामिनाची प्रक्रिया लांबल्याने कार्यकर्ते अस्वस्थ झाले होते. दरम्यान, गुरुवारी जामीन मंजूर झाला असला तरी कार्यकर्त्यांच्या जामिनाची प्रक्रिया शिल्लक असून ती झाल्यानंतरच बाहेर सुटका होणार असल्याने तोपर्यंत प्रिझन वॉर्डमध्येच मुक्काम राहणार आहे. 

आनेवाडी टोल नाक्यावरून सातार्‍यात सुरुचि येथे खासदार व आमदार गटातील कार्यकर्ते एकमेकांना भिडले. यातूनच जाळपोळ, तोडफोड व फायरिंगसारखी घटना घडली. साडेतीन महिन्यांपूर्वी घडलेल्या या घटनेनंतर पोलिसांनी दोन्ही गटांतील संशयितांना अटक केली. अटकेनंतर जामिनासाठी जिल्हा न्यायालय व उच्च न्यायालयात जामिनासाठी युक्तिवाद करण्यात आला. सुरुवातीला जामीन, अटकपूर्व अर्ज फेटाळले होते. गेल्या आठ दिवसांपूर्वी सुरुचि राडाप्रकरणी तिन्ही दोषारोपपत्र दाखल झाल्याने पुन्हा जामीनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आले.

सुरुवातीला आमदार गटातील कार्यकर्त्यांना जामीन मिळाला. याच आनंदातून सिव्हील हॉस्पिटलमधील प्रिझन वॉर्डमध्ये लुंगी डान्स झाला. दरम्यान, त्याचवेळी खासदार गटाच्यावतीनेही जामीनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला. 

सोमवारी जामीनावर सुनावणी होती मात्र लुंगी डान्समुळे प्रकरण तापल्याने व पोलिस न्यायालयात अहवाल सादर करणार असल्याने जामीनाची प्रक्रिया लांबत गेली. गेले तीन दिवस जामीनावर पुन्हा युक्तिवाद झाला व अखेर गुरुवारी दुपारी साडेपाच वाजण्याच्या सुमारास न्यायाधिशांनी जामीन अर्ज मंजूर केला. बाळासाहेब ढेकणे, इम्तियाज बागवान, विशाल ढाणे, केदार राजेशिर्के, विक्रम शेंडे व किरण कुर्‍हाडे अशी जामीन मंजूर झालेल्यांची नावे आहेत. बचाव पक्षाच्यावतीने अ‍ॅड. धैर्यशील पाटील, अ‍ॅड. ताहीर मणेर, अ‍ॅड. संदेश कुंजीर यांनी काम पाहिले. 

दरम्यान, जामीनाच्या पुर्ततेसाठी आता न्यायालयात प्रक्रिया करावी लागणार आहे. मात्र, आज शुक्रवारी सुट्टी असल्याने जामीनाची पुर्तता होणार की रेंगाळणार हे येत्या काही तासात स्पष्ट होणार आहे.