Thu, Nov 15, 2018 12:29होमपेज › Satara › खटाव : सुरेंद्र गुदगेंचा अटकपूर्व जामिन अर्ज फेटाळला

खटाव : सुरेंद्र गुदगेंचा अटकपूर्व जामिन अर्ज फेटाळला

Published On: Mar 08 2018 3:45PM | Last Updated: Mar 08 2018 3:45PMखटाव : प्रतिनिधी 

संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या मायणी ( ता.खटाव) येथील केबल व्यवसायिक मोहन जाधव यांच्या आत्महत्या प्रकरणी संशयित असलेले जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे यांचा  अटकपूर्व जामीन अर्ज आज वडूज येथील जिल्हा व अतिरिक्त न्यायालयाने फेटाळला.

गेल्या महिन्यात सोमवार दि. २६ फेब्रुवारी रोजी मायणी येथील केबल व्यवसायिक मोहन जाधव यांनी विषारी द्रव प्राशन करुन  आत्महत्या केली होती. जाधव यांच्या नातेवाईकांनी सदर घटनेची फिर्याद मायणी पोलीस ठाण्यात देताना  जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे यांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार केली होती. तणावपूर्ण वातावरणात गुदगे यांच्या विरोधात  मायणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुदगे यांनी वडूज येथील जिल्हा व अतिरिक्त न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. 

आज सुनावणीदरम्यान सरकारी व बचाव पक्षातर्फे युक्तिवाद करण्यात आला. या सुनावणी दरम्यान दोन्ही गटातील कार्यकर्त्यांनी न्यायालयापरिसरात मोठी गर्दी केलेली होती. सरकारी पक्षातर्फे अभियोक्ता नितीन गोडसे व बचाव पक्षातर्फे अँड. मुकुंद सारडा यांनी काम पाहिले. जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश आर. के. मलाबादे यांनी दोन्ही पक्षाचे म्हणणे ऐकून  सुरेंद्र गुदगे यांचा अटकपूर्व जामिन अर्ज फेटाळला. गुदगे यांचा जामिन अर्ज फेटाळल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.