Wed, Apr 24, 2019 21:53होमपेज › Satara › आमदार शशिकांत शिंदेंची प्रदेशाध्यक्षपदाची संधी हुकल्याने हुरहूर

आमदार शशिकांत शिंदेंची प्रदेशाध्यक्षपदाची संधी हुकल्याने हुरहूर

Published On: Apr 29 2018 11:14PM | Last Updated: Apr 29 2018 11:12PMसातारा : प्रतिनिधी 

प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे येथे झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत पक्षाध्यक्ष खा. शरद पवार यांनी प्रदेशाध्यक्षपदी सांगलीचे आ. जयंत पाटील यांचे नाव  जाहीर केल्याने  सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये निरुत्साहाचे वातावरण निर्माण झाले. या पदासाठी  आ. शशिकांत शिंदे प्रबळ दावेदार मानले जात होते. मात्र, त्यांची  संधी हुकल्याने बालेकिल्ला असलेल्या सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना हुरहूर लागून राहिली आहे.  दरम्यान, जावली तालुक्यातील कार्यकर्त्यांनी संतापही व्यक्त केला आहे.

आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यानुसार नव्या दमाची टीम फिल्डवर उतरवण्यासाठी हालचाली सुरु आहेत. विद्यमान प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर त्यांची पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत निवड झाली. त्यामुळे नव्या प्रदेशाध्यक्ष निवडीकडे सातारा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाच्या नजरा लागल्या होत्या. या पदासाठी आ. शशिकांत शिंदे यांच्या नावाची सातारा जिल्ह्यात चर्चा सुरु होती. आ. शशिकांत शिंदे हे वजनदार  नेते असल्याने खा. शरद पवार ही निवड करताना त्यांच्या नावाचा प्राधान्याने विचार करतील असा कयास जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बांधला होता.

आ. शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादी पक्षाची स्थापना झाल्यापासून आजपर्यंत पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते, आमदार व कुशल संघटक म्हणून ओळखले जातात. 1999 पासून सुरूवातीला 10 वर्षे जावलीचे तर मागील 9 वर्षे कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून  ते कार्यरत आहेत. यापूर्वी आ.शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्षपद भूषवले. मागील आघाडी सरकारच्या कालावधीत ते सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून कार्यरत होते. त्याचबरोबर माथाडी कामगारांचे मोठे संघटन त्यांनी आजपर्यंत केले आहे. त्यामुळे त्यांना प्रदेशाध्यक्षपदी  संधी मिळेल असा दावा जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला होता. प्रत्यक्षात मात्र, रविवारी पुण्यात झालेल्या बैठकीत  खा. शरद पवार यांनी जयंत पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे आ. शशिकांत शिंदे 

यांची प्रदेशाध्यक्षपदाची संधी हुकली. असे असले तरी आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी पक्ष जिल्ह्यात आणखी भक्कम करुन भाजप - शिवसेना युतीला चारीमुंड्या चित करण्याचा विश्‍वास राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.