Tue, Jul 16, 2019 21:51होमपेज › Satara › ऊस तोडीसाठी शेतकरी मारताहेत खेटे

ऊस तोडीसाठी शेतकरी मारताहेत खेटे

Published On: Mar 06 2018 1:55AM | Last Updated: Mar 06 2018 1:17AMसातारा : प्रतिनिधी

सातारा जिल्ह्यात उसाचा गळीत हंगाम सध्या अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत आहे. आपला ऊस लवकरात लवकर कसा जाईल, यासाठी शेतकरी मात्र कारखान्यावर खेटे घालताना दिसत आहेत. ऊसतोड टोळ्या व वाहतूकदार यांच्याकडून ऊस उत्पादक शेतकर्‍यांची लूट होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. 

सातारा जिल्ह्यात 8 सहकारी व 6 खासगी साखर कारखाने आहेत.सर्वच कारखान्यांमध्ये पूर्ण क्षमतेने उसाचे गाळप सुरू असल्याचे चित्र ठिकठिकाणी पहावयास मिळत आहे.तसेच ऊस तोडणीचा हंगाम अंतिम टप्प्याकडे निघाला आहे. जिल्ह्याच्या अनेक भागातील शेतशिवारांमध्ये मोठ्या प्रमाणात अजूनही ऊस उभा आहे. तसेच काही उसाला तुरेही आले आहेत. त्यामुळे  ऊस साखर कारखान्यांनी वेळेत न्यावा, यासाठी शेतकर्‍यांचे कारखान्यावर हेलपाटे सुरू झाले आहेत. ऊसतोड टोळ्या शेतकर्‍यांकडे एकरासाठी  दीड ते अडीच हजार रुपयांची मागणी करत आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांनाही नाईलाजास्तव पैसे देणे भाग पडत आहे. कोणत्याही  कारखान्याचे व्यवस्थापन लक्ष घालत नसल्याने टोळीवाल्यांचे चांगलेच फावले आहे. काही कारखान्याचे चिटबॉय शेतकर्‍याला स्वत:च ऊस तोडण्यासाठी पैसे देण्यास सांगत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांची आर्थिक पिळवणूक होत असून  न्याय कोणाकडे मागायचा, असा प्रश्‍न पडला आहे. शासननियमानुसार ऊस तुटुन गेल्यानंतर 15 दिवसात शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर पैसे जमा होणे गरजेचे आहे. मात्र 2 महिन्यांहून अधिक कालावधी लुटला तरी बहुतांश कारखान्यांनी शेतकर्‍यांच्या खात्यावर उसबीले जमा केली नाहीत. त्यामुळे शेतकर्‍यांना मार्च एंडीगच्या काळात कारखान्यावर हेलपाटे मारावयास लागत आहेत. शिवाय दोन महिन्याच्या पिक कर्जाच्या व्याजाचा भुर्दंड शेतकर्‍यांना हकनाक सोसावा लागत आहे. 

बहुतांश कारखान्यांनी अलिखीत एकी करून सरासरी 2650 रुपये दर देवून शेतकर्‍यांची अडवणूक केली आहे. साखरेला जिल्ह्यात सरासरी 11.68 रिकव्हरी बसत आहे त्यामुळे शासन नियमानुसारच दर देणे कारखान्यांना बंधनकारक आहे. मात्र रिकव्हरीप्रमाणे कारखाने दर देत नसल्याने शेतकर्‍यांमधून प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे.