Fri, Jul 19, 2019 20:00होमपेज › Satara › कुणाला लागणार मोक्‍का; कुणावर फौजदारी?

कुणाला लागणार मोक्‍का; कुणावर फौजदारी?

Published On: Feb 08 2018 1:54AM | Last Updated: Feb 07 2018 11:07PMसातारा : सुनील क्षीरसागर

साखरेचे बाजारातील दर खाली आल्यानंतर (की आणल्यानंतर?) साखर कारखानदारांमध्ये एकच खळबळ माजली असून साखरेच्या दराचे भांडवल करुन ऊस दरात घट करण्याचा डाव कारखानदारांकडून खेळला जात आहे. दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी जादा दर देण्याबाबत असमर्थतता दर्शवल्यानंतर इतर जिल्ह्यातही सावध पावले टाकली जात आहेत. याचवेळी शेतकरी संघटनांकडून दर कमी केला तर ‘मोक्‍का’ लावण्याबरोबरच ‘फौजदारी करण्याचीही मागणी केली जात आहे.  दरम्यान या वावटळीत साखर कारखानदारांची भूमिका अद्याप गुलदस्त्यातच आहे. 

दरवर्षी साखरेेचे दर खाली-वर झाले की साखर सम्राटांमध्ये खळबळ उडते. कारखाने सुरु झाले की व्यापारी बाजारपेठेत साखर हळूहळू खाली  येते. दरवर्षी हीच परिस्थिती निर्माण झाल्यानंतर साखर कारखानदारांचे आयतेच फावते. यावर्षीही तीच परिस्थिती झाली आहे. बाजारपेठेत आरोळी ठोकली गेली साखरेचे दर पडले. याच आरोळीचे प्रतिध्वनी अवघ्या सहकार विश्‍वात उमटले आणि ऊसाला आता जादा दर देणे अशक्य असल्याचे मत साखर कारखानदारीच्या पेटलेल्या चिमण्यातून व्यक्‍त होवू लागले.

यावर्षी 3000 ते 3500 रुपये दर उसाला मिळणार ही काळ्या दगडावरची रेघ होती. तशी खुशीही ऊस उत्पादकांनी व्यक्‍त केली होती.  मात्र, आता काय? साखर खाली पडलिया  असा बोभाटा जिकडे तिकडं झाला आहे. 

साखरेच्या दरावरच ऊस दर मिळणार का? असाही सवाल उत्पादकांमधून केला जात आहे. सातारा जिल्ह्यात अनेक साखर कारखानदारांनी ऊसाचे गाळप सुरु ठेवले आहे. मात्र, अद्यापही ऊस दराबाबत संशयाचेच वातावरण आहे. सातारा जिल्ह्यात ऊसाला नेमका किती पहिला हप्‍ता मिळणार? याबाबत उत्पादकही साशंकच आहेत.
याचवेळी शेतकरी संघटनांनी फौजदारी आणि मोक्‍काची कारवाई करण्याचा इशारा दिल्यानंतरही नेमके काय होणार? याकडे तमाम शेतकर्‍यांचे लक्ष लागून राहिले आहे.