Fri, Jul 19, 2019 05:16होमपेज › Satara › मराठा क्रांती मोर्चावर होता सुधन्वाचा ‘वॉच’

मराठा क्रांती मोर्चावर होता सुधन्वाचा ‘वॉच’

Published On: Aug 14 2018 12:10AM | Last Updated: Aug 14 2018 12:10AMसातारा : हरीष पाटणे 

मुंबई एटीएसने केलेल्या कारवाईत अटक करण्यात आलेल्या सातार्‍यातील सुधन्वा गोंधळेकरचे अनेक कारनामे पुढे येऊ लागले असून गेल्या दोन वर्षांत सातार्‍यातील ‘मराठा रणरागिणी’ या व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपवर पत्नीच्या नावावर घुसखोरी करून सुधन्वा गोंधळेकरची मराठा क्रांती मोर्चात हेरगिरी सुरू असल्याचे समोर आले आहे. गेल्या दोन वर्षांत गोंधळेकरचा मराठा क्रांती मोर्चावर वॉच का होता, असा प्रश्‍न आता निर्माण झाला असून संबंधित यंत्रणेने त्या दिशेनेही तपास करण्याची मागणी होऊ लागली आहे.

सणासुदीच्या काळात राज्यात घातपाती कारवाया करण्याच्या तयारीत असल्याच्या मिळालेल्या माहितीवरून  मुंबई एटीएसच्या पथकाने नालासोपार्‍यातील हिंदुत्ववादी संघटनेच्या वैभव राऊत याला अटक केल्यानंतर याच कनेक्शनमध्ये असलेल्या सातार्‍याच्या सुधन्वा गोंधळेकर यालाही अटक करण्यात आली. गोंधळेकरकडे शस्त्रसाठाही सापडला. सातार्‍यासारख्या एकेकाळच्या पेन्शनरांची सिटी असलेल्या शांत शहरात गोंधळेकरच्या अटकेने व त्याच्याकडील शस्त्रसाठ्याने एकच हलकल्लोळ माजला. अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे डॉ. हमीद दाभोलकर यांनीही डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येशी सुधन्वाचा संबंध आहे का? याद‍ृष्टीने तपास करण्याची मागणी केली. एकीकडे दररोज हे असे ‘हॅपनिंग’ घडत असताना दुसरीकडे सुधन्वा दोन वर्षे सातार्‍यात काय करत होता? 

याविषयी अनेकांच्या मनात शंका-कुशंका सुरू  आहेत. सुधन्वावर यापूर्वीच सातार्‍यात दोन गुन्हे दाखल असल्याचेही समोर आले. या गुढ व्यक्‍तीमत्वाची अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता अत्यंत धक्कादायक प्रकार ‘पुढारी’च्यासमोर आला. 

गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्रात मराठा क्रांती मोर्चाचे वारे आहे. मराठा समाज लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरत आहे. याच कालावधीत राज्यातील मराठा समाजबांधवांनी सोशल मीडियावर मराठा क्रांती मोर्चाची जोरदार रणधुमाळी माजवली. लाखोंच्या संख्येने मराठा क्रांती मोर्चाचे व्हॉटसअप ग्रुप तयार झाले. त्यावर मराठा क्रांती मोर्चा व मराठा समाज या अनुषंगाने मेसेज व्हायरल होवू लागले.सातारा ही छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी. या राजधानीतही मराठा युवक, मराठा संघटना, मराठा समाजातील महिला यांनी वेगवेगळे व्हॉटसअप ग्रुप तयार केले. ‘मराठा रणरागिनी’ नावाचा एक व्हॉटसअप ग्रुपही दोन वर्षापूर्वी तयार झाला.  त्यावर मराठा समाजातील युवती व महिला क्रांती मोर्चाचे काम करत होत्या. याच कालावधीत ‘जी.सुधन्वा’ नावाची एक महिलाही मराठा रणरागिनी ग्रुपमध्ये सामील झाली. मराठा महिलांचा ग्रुप असल्याने ग्रुपमध्ये सामील झालेली प्रत्येक महिला ही मराठा समाजाची असणार व ती महिलाच असणार असाच समज प्रत्येकीचा होता.

संबंधीत ग्रुपवर मराठा क्रांती मोर्चाच्या अनुषंगाने नियोजन व चर्चा होत असे.  त्यावर ‘जी.सुधन्वा’ हिची सुद्धा प्रतिक्रिया असायची.  मतभेदाचे अनेक प्रसंग चर्चेदरम्यान घडायचे. मुंबईच्या महामोर्चापर्यंत काय नियोजन आहे, कसे नियोजन आहे, काय मागण्या आहेत यावर होणार्‍या चर्चेत ही  ‘जी.सुधन्वा’ भाग घ्यायची. मुंबईच्या महामोर्चानंतर मात्र ‘जी.सुधन्वा’ आक्रमकपणे व्यक्‍त होवू लागली.  तिला त्याच ताकदीने अन्य महिला उत्तर देवू लागल्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केले असा मेसेज ग्रुपवर पडला तर लगेचच ‘खरे स्वराज्य बाजीरावानेच स्थापन केले’ अशी प्रतिक्रिया ही सो कॉल्ड सुधन्वा द्यायची. त्यावरून ग्रुपमधील महिला रणरागिनी व सुधन्वाचे अनेकदा भांडणही झाले. मराठा क्रांती मोर्चा हा तुमचा इव्हेंट आहे, अशा पद्धतीची दुषणे सुधन्वाकडून यायची. 

ग्रुपवरील चर्चेदरम्यान सुधन्वाच्या व्यक्‍त होण्याच्या पद्धतीनंतर रणरागिणींमधील काही महिलांना शंका आली आणि त्यांनी थेट त्या नंबरला फोन लावला तर तो फोन पुरूषाने उचलला. ‘हा माझ्या पत्नीचा नंबर आहे, तिने काय लिहिले मला माहित नाही’ असे उत्तर महिलांना मिळाले. मात्र, संबंधीत सुधन्वाची पत्नीही सुशिल व शांत स्वभावाची असल्याने ती असे लिहू शकत नाही, अशी माहिती  रणरागिणींनी काढली. त्याचवेळी ‘जी.सुधन्वा’  म्हणजे सुधन्वा गोंधळेकर हा ब्राम्हण समाजातील पुरूष आहे. त्याने मराठा समाजातील मुलीशी लग्‍न केले आहे. पत्नीचे नाव मराठा रणरागिणी ग्रुपवर अ‍ॅड करून ‘जी. सुधन्वा’ या  नावाने तोच ग्रुपवर व्यक्‍त होत होता हे महिलांच्या लक्षात आले आणि त्यांनी गोंधळेकरला चांगलेच खडसावले होते.  

चार दिवसांपूर्वी वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रांमधून या सुधन्वा गोंधळेकरचे कारनामे  बाहेर पडले तेव्हा हाच तो सुधन्वा गोंधळेकर जो ‘शिखंडी’प्रमाणे पत्नीच्या नावाआड स्वत:च मराठा रणरागिणी ग्रुपमध्ये घुसून हुज्जत व वाद घालत होता हे समोर आले. सुधन्वा गोंधळेकरची समोर आलेली पार्श्‍वभूमी पाहता दोन वर्षापूर्वी त्याने मराठा क्रांती मोर्चाच्या ग्रुपमध्ये घुसखोरी करण्याचे कारण काय?  गेल्या दोन वर्षात मराठा क्रांती मोर्चाची माहिती तो का घेत होता? मराठा समाजातील महिला रणरागिणींशी तो वाद का घालत होता? मराठा क्रांती मोर्चावर त्याचा वॉच का होता? त्याची ही हेरगिरी कशासाठी सुरू होती? असे सवाल गोंधळेकरच्या अटकेनंतर व  व्हॉटसअप ग्रुपमध्ये घुसखोरी केलेल्या कारस्थानानंतर निर्माण झाले आहे. एटीएसने त्याद‍ृष्टीनेही तपास करण्याची आवश्यकता असून या संपूर्ण प्रकाराची चौकशी करण्याची मागणी मराठा रणरागिणींनी केली आहे.