Sat, May 30, 2020 03:57होमपेज › Satara › रस्त्यासाठी केले विद्यार्थ्यांनी श्रमदान

रस्त्यासाठी केले विद्यार्थ्यांनी श्रमदान

Published On: Sep 08 2018 1:33AM | Last Updated: Sep 07 2018 10:07PMतारळे : वार्ताहर

प्रशासनाच्या भोंगळ कारभाराला कंटाळून कळंबे (ता. पाटण) येथे विद्यार्थ्यांनीच श्रमदान करून रस्त्याचे काम केले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली असून प्रवाशांकडून विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

कळंबे फाटा ते बामणेवाडी या 14 किलोमीटर रस्त्याचे काम प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून झाले आहे. मात्र काही ठिकाणच्या निकृष्ट कामामुळे रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. कळंबे फाटा ते कळंबे हायस्कूल यादरम्यान काही रस्ता वनविभागाच्या हद्दीतून जात असल्याने तो तसाच कच्चा रस्ता राहिला आहे. पावसामुळे या परिसरात मोठी दुरवस्था झाली होती. कळंबे, डफळवाडी, केंजळवाडी, भोकरवाडी, बागलेवाडी, जिमणवाडी या गावच्या लोकांची, विद्यार्थी व रुग्ण यांची रहदारी असते. तसेच जळव, जांभेकरवाडी व डफळवाडी येथील विद्यार्थ्यांची रहदारी असते. रस्ता दोन्ही बाजूला खचला असून तेथे चिखल झाला आहे.

याठिकाणी मध्यभागीच चढ राहिल्याने तेथे चारचाकी वाहने अडकून  बसतात. रस्त्याच्या एका बाजूला खोल नाला आहे. तर दुसर्‍या बाजूला दरी असल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेकवेळा एसटी जात नसल्यामुळे लोकांसह विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागते. रस्त्याच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधूनही प्रशासन लक्षच देत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांसह परिसरातील ग्रामस्थ वैतागले होते. अखेर प्रशासनाच्या नाकावर टिच्चून विद्यार्थ्यांनीच श्रमदान करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार रस्ता सुरळीत करण्यात आला असून या मार्गावर ठप्प झालेली वाहतूक सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांनी श्रमदान करून प्रशासनाला एकप्रकारे चपराकच दिली आहे. त्यामुळेच किमान प्रशासनाला जाग येणार का ? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.