Sun, Apr 21, 2019 05:52होमपेज › Satara › जिजामाता बँक विरोधात लवकरच महामोर्चा

जिजामाता बँक विरोधात लवकरच महामोर्चा

Published On: Jan 15 2018 1:44AM | Last Updated: Jan 15 2018 12:25AM

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

अफरातफर व चुकीच्या नियोजनामुळे अडचणीत आलेल्या जिजामाता महिला बँकेच्या ठेवीदारांच्या ठेवी सव्याज परत मिळाव्यात म्हणून लवकरच सातार्‍यात ठेवीदारांचा महामोर्चा काढण्यात  येणार असून ठेवीदारांच्या पैशावर ऐषोराम करणार्‍या वर्षा माडगूळकर व शिरीष कुलकर्णी यांना अटक झाल्याशिवाय आणि ठेवीदारांच्या घामाचे व हक्काचे पैसे त्यांना परत मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असा इशारा मनसेचे राज्य उपाध्यक्ष संदीप मोझर यांनी दिला आहे. 

जिजामाता बँकेच्या ठेवीदारांची बैठक स्वराज्य प्रतिष्ठान व मनसेच्या पिरवाडी- सातारा येथील कार्यालयात झाली. त्यावेळी ते बोलत होते. 
जिजामाता महिला बँकेत समाजाच्या सर्व स्तरातील नागरिकांच्या कोट्यवधी रुपयांच्या ठेवी अडकल्या आहेत. मनमानी कारभार आणि चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे अडचणीत आलेली ही बँक विलिन  करुन घेण्यास कोणतीही वित्तीय संस्था तयार नाही. सातारा, कराड, कोरेगाव आदी तालुक्यातील तसेच मुंबई-पुणेस्थित जिल्हावासीयांच्या सुमारे 79 हजार सभासदांच्या ठेवी या बँकेत अडकल्याने संबंधितांची फार मोठी कोंडी झाली आहे, असेही मोझर यांनी सांगितले.

ठेवीदारांचे प्रतिनिधी प्रल्हाद जाधव, आनंद जगताप, मोतीराम पाटील, मालपाणी आदींनी आपल्या ठेवींबाबत आणि बँक अधिकारी, कर्मचारी व चेअरमन आणि त्यांच्या ‘बोलवत्या धन्या’बाबतचे आपले अनुभव विषद केले. बँकेच्या अध्यक्षा वर्षा माडगुळकर यांचा चालक तसेच बँकेतील काही अधिकारी व माडगुळकर-कुलकर्णी कुटुंबियांचे काही नातेवाईक ठेवी परत मिळवून देतो, असे सांगत अनामत रकमेच्या पावत्या जमा करत आहेत. असे अनुभवही काहींनी सांगितले.  कोणत्याही परिस्थितीत ठेवीच्या रकमा सव्याज परत मिळवणारच, असा निर्धार ठेवदारांनी व्यक्त केला.

संदीप मोझर म्हणाले की, आपण बँकेत ठेवलेल्या कष्टाच्या कमाईवर ऐश करणार्‍या जिजामाता बँकेच्या पदाधिकार्‍यांना धडा शिकवण्यासाठी सर्वांनी कायदेशीर आणि रस्त्यावरच्या लढाईसाठी सिद्ध झाले पाहिजे. ‘रयत -कुमुदा’ साखर व्यवस्थापनाविरुद्धचा लढा 20 हजार शेतकर्‍यांसाठी होता. मायक्रोफायनान्स कंपन्यांविरोधात गावोगावच्या माताभगिनींसाठी मी लढ्यास सिद्ध झालो आणि आता 79 हजार कुटुंबाच्या ठेवींच्या हितरक्षणासाठी सुरु केलेला लढाही तितक्याच ताकदीने यशस्वी करणारच.कष्टाची रक्कम मिळण्यासाठी बँकेच्या अध्यक्षा अ‍ॅड. वर्षा माडगुळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष कुलकर्णी, सर्व संचालक आणि जबाबदार अधिकार्‍यांना अटक झाल्याशिवाय या प्रश्‍नाला ठोस मार्ग सापडणार नाही, असेही ते म्हणाले.

या बैठकीत आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी ठेवीदारांच्या निवडक प्रतिनिधींची कोअर कमिटीही स्थापन्यात आली. त्यामध्ये मोतीराम पाटील, प्रल्हाद जाधव, आनंद जगताप, नामदेव चाळके, नरेेंद्र बोराटे, प्रभाकर देशमुख आदींचा समावेश करण्यात आला. या कोअर कमिटीची दर आठवड्याला बैठक होऊन आंदोलनाचे नियोजन करण्यात येईल, असे यावेळी ठरविण्यात आले. 
या बैठकीत अ‍ॅड. पद्माकर पवार, अ‍ॅड.चंद्रकांत राक्षे, अ‍ॅड. नूतन बाबर, अ‍ॅड. गिता पटेल आदींनी मार्गदर्शन केले.