Sat, Apr 20, 2019 08:43होमपेज › Satara › भिलारमध्ये स्ट्रॉबेरी महोत्सवाचे उद्घाटन

भिलारमध्ये स्ट्रॉबेरी महोत्सवाचे उद्घाटन

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

भिलार : वार्ताहर

ढोल लेझीम,पारंपरिक वेशभूषा परिधान केलेले मावळे, लहान मुलींचे लेझीम पथक, स्ट्रॉबेरी, पुस्तकांच्या गावाची माहिती सांगणारा चित्ररथ,  फुलांनी सजवलेल्या पालखीत स्ट्रॉबेरी फळांची केलेली मांडणी अशा उत्साही वातावरणात भिलार येथे स्ट्रॉबेरी महोत्सवाचे उद्घाटन झाले. 

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब भिलारे, जि.प. सदस्या सौ. नीता आखाडे, सभापती रूपाली राजपूरे, जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्रशेठ राजपूरे, राजेंद्र भिलारे, प्रांताधिकारी अस्मिता मोरे, सपोनि तृप्‍ती सोनावणे, सरपंच वंदना भिलारे, प्रवीण भिलारे, लागीरंच्या कलाकार नीलिमा कमाने, सुनीता कुदळे, गटविकास अधिकारी दिलीप शिंदे व ग्रामस्थ उपस्थित होते.

महाबळेश्‍वर तालुका हा निसर्गसंपन्न तालुका असून येथील शेतकर्‍यांची स्ट्रॉबेरीच्या माध्यमातून आर्थिक क्रांती झाली आहे. विविधतेने समृद्धी प्राप्त केलेेल्या भिलारला पुस्तकाच्या गावाचे कोंदण लाभले आहे आणि आता  स्ट्रॉॅबेरी व पर्यटन महोत्सवामुळे भिलारचे नाव सातासमुद्रापार पोहोचले असल्याचे प्रतिपादन वसंतराव मानकुमरे यांनी  आपल्या भाषणात केले.बाळासाहेब भिलारे म्हणाले, भिलारच्या परंपरेला साजेसा असा महोत्सव दरवर्षी आयोजित करण्यात येत असून स्ट्रॉबेरी या फळाला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त होऊन येथील स्ट्रॉबेरी उत्पादकांची आर्थिक उन्नती व्हावी, हाच एकमेव उद्देश या 
महोत्सवाचा आहे. 

महोत्सवाचे उदघाटन झाल्यानंतर पाचगणी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथून स्ट्रॉबेरी व पर्यटन महोत्सवाच्या दिंडीला प्रारंभ झाला. या मिरवणुकीत डॉल्बी बरोबरच विद्यार्थ्यांचे आकर्षक लेझीम पथक, पुस्तकांच्या गावाची महती सांगणारा चित्ररथ सहभागी झाले होते. तजेलदार व लाल चुटूक स्ट्रॉबेरीची पालखी हे या मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण होते.  ही दिंडी शिवाजी चौकात आल्यावरपुढे ती बसस्थानक मार्गे महाबळेश्‍वरकडे रवाना झाली. महाबळेश्‍वरच्या बाजारपेठेतूनही ही मिरवणूक जल्लोषात निघाली. यामध्ये स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी, ग्रामस्थ सहभागी झाले होते.

Tags : Satara, Satara News, strawberry, festival,  Bhilar


  •