Wed, May 27, 2020 08:18होमपेज › Satara › पालिका-नगरपंचायतींच्या कामांना ‘ब्रेक’

पालिका-नगरपंचायतींच्या कामांना ‘ब्रेक’

Last Updated: Dec 06 2019 1:12AM
सातारा : प्रतिनिधी
राज्य शासनाने वैशिष्ट्यपूर्ण, नगरोत्थान, रस्ते अनुदान आदी योजनांखाली नगरपालिका तसेच नगरपंचायतींद्वारे केल्या जाणार्‍या कामांना ‘ब्रेक’ लावला आहे. कार्यारंभ आदेश न दिलेल्या कामांना पुढील आदेश होईपर्यंत सुरुवात करू नये, असे सर्व मुख्याधिकार्‍यांना बजावण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 9 नगरपालिका आणि 7 नगरपंचायतींच्या कोट्यवधींची कामे ठप्प राहणार आहेत.

जिल्ह्यात सातारा, वाई, महाबळेश्वर, पाचगणी, फलटण, रहिमतपूर, म्हसवड, कराड आणि मलकापूर अशा नऊ नगरपालिका आहेत. तर, पाच वर्षांपूर्वी तालुक्याच्या प्रत्येक ठिकाणी नगरपंचायती स्थापन झाल्या. त्यामध्ये कोरेगाव, खंडाळा, दहिवडी, पाटण, खटाव, मेढा आणि लोणंद या ग्रामपंचायतींचे नगरपंचायतींमध्ये रुपांतर झाले. ‘अ’ वर्ग नगरपालिकांच्या तुलनेत ‘ब’ आणि ‘क’ वर्ग नगरपालिकांचा भाग अद्यापही मागास आहे. त्याहूनही अवस्था नगरपंचायतींची आहे. नगरपंचातींमध्ये अद्यापही ग्रामीण बाज असलेला परिसर असल्याने विकासासाठी निधीची आवश्यता आहे. नव्याने स्थापन झालेल्या नगरपंचायतींना सुरुवातीची काही वर्षे शासन निधी देते. त्यानंतर  मात्र स्वहिस्सा भरून शासनाच्या वेगवेगळ्या अनुदानावर अवलंबून रहावे लागते. सध्या जिल्ह्यातील सर्व नगरपालिका आणि नगरपंचातींवर आर्थिक अरिष्ट्य कोसळले आहे.

राज्य शासनाकडून नगरपालिका आणि नगरपंचायतींना विविध योजनांतून विकासकामासाठी अनुदान दिले जाते. नवी नगरपालिका, नगरपालिका हद्दवाढ, नगरपरिषद यात्रास्थळ, वैशिष्ट्यपूर्ण, नवी नगरपंचायत, ठोक तरतूद, रस्ता अनुदान, नगरोत्थान अशा अनेक योजनांच्या माध्यमातून विकास साधण्याचा प्रयत्न असतो. मात्र या योजनांतर्गत सन 2019-2020 या आर्थिक वर्षात निधी वितरीत करण्यात आला होता. ज्या कामासाठी निधीचे वितरण केले होते. त्यापैकी कार्यारंभ आदेश न दिलेली कामांवर पुढील आदेश मिळेपर्यंत कोणतीही कार्यवाही करु नये, असे शासनाने बजावले आहे.  नगरोत्थान प्रकल्पाबाबतीत वर्क ऑर्डर  न दिलेली कामेही थांबवली आहेत. तसेच वर्क ऑर्डर दिलेल्या कामांची यादी शासनाने तात्काळ मागवली आहे. शासनाला कळवलेल्या कामांच्या वर्क ऑर्डरशिवाय इतर कामांच्या वर्क ऑर्डर पुन्हा आढळल्यास संबंधितांना जबाबदार धरुन त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाला याबाबत सुचित करण्यात आले असून गुरुवारी दिवसभर संबंधित मुख्याधिकार्‍यांची धावपळ सुरु होती.

ग्रामीण भागातील कामांवरही परिणाम 
सातारा जिल्हा परिषदेच्या बांधकाम, पाणीपुरवठा विभागातील विविध योजनांच्या कामांना वर्क ऑर्डर देण्यात आलेल्या नाहीत, अशा कोट्यवधींच्या कामांनाही स्थगिती मिळाली आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग दक्षिण व उत्तर तसेच ग्रामीण पाणीपुरवठा विभागातही माहिती देण्याची कार्यवाही सुरू होती. शासनाच्या या फतव्यानुसार बांधकाम उत्तरमधील सुमारे 3 ते 4 कोटी रुपयांच्या कामांना वर्क ऑर्डर देण्यात आल्या नव्हत्या. तर, बांधकाम दक्षिणमधील सुमारे 250 हून अधिक कामांच्या सुमारे 20 कोटींच्या कामांना वर्क ऑर्डर देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे या कामांना स्थगिती मिळाली आहे. त्यामुळे गावोगावी होणार्‍या रस्ते, गटर, समाज मंदिर, संरक्षण भिंत बांधणे, बागबगीचा सुशोभिकरणाच्या कामांना आता ‘ब्रेक’ मिळाला असल्याने गावांचा विकास काही दिवसासाठी तरी रखडणार असल्याचे चित्र आहे.