Thu, Apr 25, 2019 15:58होमपेज › Satara › जवाब दो... कौन है मास्टर माईंड?

जवाब दो... कौन है मास्टर माईंड?

Published On: Aug 20 2018 12:04AM | Last Updated: Aug 19 2018 11:46PMज्यांनी उभी हयात गांधी मार्गावरुन वाटचाल केली, आयुष्यभर शांततेचा पुरस्कार केला, गोरगरीबांची उद्ध्वस्त होणारी कुटुंबे वाचवण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य हाती घेतले, अहिंसेचा मार्ग स्वीकारत लोकोद्धाराचे कार्य केले, त्या  डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या शरीराच्या छिलन्या बंदुकीच्या गोळ्यांनी होतील, आतंकी हिंसाचाराचे ते बळी ठरतील आणि एका शांतीपर्वाचा कडेलोट व्हावा एवढी भयावह चिड सामान्य माणसांमध्ये 5 वर्षांत हत्त्याकांडाच्या तपासात दिरंगाई झाल्याने निर्माण होईल,  हे सारे अतर्क्य आणि अनाकलनीय आहे. 

5 वर्षांपूर्वी हत्या होवूनही डॉ. नरेंद्र दाभोलकरांचे मारेकरी मोकाट होते, आपापल्या मार्गाने पसार होते, महाराष्ट्राची पोलिस यंत्रणा त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नव्हती. दाभोलकरांसारख्या श्रेष्ठ विचारवंताला मारल्यानंतरही आपले कुणी वाकडे करु शकत नाही या अर्विभावात हे सारे मारेकरी वागत होते. कर्नाटकच्या पोलिसांनी गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी अमोल काळे याला अटक केल्यानंतर सापडलेली डायरी महाराष्ट्र पोलिसांसाठी संजीवनी ठरावी. मात्र, तोपर्यंत महाराष्ट्राचे पोलिस दल, सीबीआय सारेच सुस्त कसे होते? तपासाची दिशा ठरवण्यात या सार्‍यांना अपयश आले होते आणि मारेकरी विचारवंतांच्या छाताडावर धमक्या देत नाचत होते. कोण फेसबुकच्या पोस्टवरुन तर कोण व्हॉटस्अपच्या ग्रुपमधून आतंक फैलावत होता. तरीही पोलिस यंत्रणेच्या नजरेत यांचा आतंकवाद दिसत नव्हता याचेच आश्‍चर्य वाटते. 

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या प्रकरणात औरंगाबादमधून अटक करण्यात आलेला सचिन अंदुरे याला दाभोलकरांबाबत काय  माहिती होती? मुळात या अंदुरेचे शिक्षण काय? त्याला दाभोलकरांच्या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्याचा राग येण्याचे कारण काय? औरंगाबादच्या अंदुरेच्या सातार्‍याच्या दाभोलकरांशी संबंधच काय? अंदुरेच्या रिव्हॉल्वर मागचे हात दाभोलकरांच्या छातीपर्यंत पोहोचतातच कसे? अंदुरेला औरंगाबादेतून पुण्यात आणणारा शरद कळसकर या अंदुरेला कसा काय ऑपरेट करत होता? नालासोपारा येथे जी स्फोटके सापडली ती ज्यांची आहेत त्यात हा औरंगाबादचा कळसकर आहे तसाच सातार्‍याचा सुधन्वा गोंधळेकरही आहे. हा गोंधळेकर व तो कळसकर हे दोघेही हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते आहेत म्हणे. मुळात अंदुरेला दाभोलकरांच्या छातीपर्यंत पोहोचवणार्‍या कळसकरलाही दाभोलकरांच्या फिरण्याच्या मार्गापर्यंत पोहोचवला कुणी? गोंधळेकर, वैभव राऊत व कळसकर यांच्याकडे जर शस्त्रांचा साठा सापडला आहे तर दाभोलकरांच्या हत्येची कबुली देणार्‍या कळसकरशी गोंधळेकरचा नेमका संबंध काय आहे? कळसकरला दाभोलकरांची इत्यंभुत माहिती कोण देत होता? दाभोलकरांची दिनचर्या, त्यांचा फिरण्याचा परिसर, त्यांची व्यायामाची वेळ या सार्‍याची माहिती नेमकी कुणाकडे होती? आणि ही माहिती कळसकरला कोण पुरवत होता? या सार्‍याची एटीएस व सीबीआयने उकल केली पाहिजे. 

कळसकरने हत्येची कबुली दिली आहे. अंदुरे याला  हत्येप्रकरणात अटक करण्यात आली आहे असे असले तरी कळसकर अथवा अंदुरे ही फक्त ‘प्यादी’ असावीत. खरे ‘मास्टर माईंड’ अजूनही बाहेरच असणार आहेत, जे महाराष्ट्रामध्ये अशांतता निर्माण करण्यासाठी तयार झालेल्या परिस्थितीचा फायदा उठवण्यात गेल्या काही वर्षांत व्यस्त आहेत, जे महाराष्ट्रभर निर्माण झालेल्या जातीयवादाच्या परिस्थितीचे दंगलीत रुपांतर होण्यासाठी आसुसले आहेत, ज्यांना महाराष्ट्रभर दंगे उसळून देवून महाराष्ट्रातील जाती एकमेकांविरोधात  उभ्या करुन घरे पेटवायची आहेत. त्यांना दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश अशा विचारवंतांचे विचार संपवायचे आहेत. त्यामुळेच त्यांची ‘प्यादी’ कधी मराठा मोर्चाच्या व्हॉटस्अप ग्रुपमध्ये घुसखोरी करुन हेरगिरी करतात तर कधी दलित समाजाच्या नेत्यांना भडक विधाने करण्यासाठी प्रवृत्त करतात. उद्भवलेल्या परिस्थितीचे जातीय भांडवल करत कधी मोठ्या समुदायामध्ये अचानक गोंधळ निर्माण करण्याचे कारस्थान रचतात तर कधी कधी महामार्गावर शांततेने चाललेल्या आंदोलनात अचानक शिववंदनेचा आग्रह धरुन डोकी भडकवतात तर कधी भीमा-कोेरेगाव घडवून आणतात.  कधी पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर भगदड माजवून सोडतात तर कधी औरंगाबादेत  दंगल घडवून आतंक माजवतात. या सार्‍या मागचे हात पाहू नका डोकी पहा!

सातार्‍याच्या मराठा मोर्चाची हेरगिरी करणारा गोंधळेकर असू द्या किंवा औरंगाबादच्या मराठा मोर्चावेळी झालेल्या जातीय दंगलीशी संबंधित सचिन अंदुरे असू द्या, यांचीच नावे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येशी संबंधित असलेल्या व्यक्तींशी  कशी काय जोडली गेली आहेत? ज्यांची नावे दाभोलकर हत्येच्या अनुषंगाने होत असलेल्या तपासात येत आहेत त्यांचीच नावे दंगलीशी संबंधित येत आहेत. ही लिंक नेमकी काय आहे? मग  या सार्‍यांना भडकवणारा ‘मास्टर माईंड’ कुठे दडून बसला आहे? विचारवंतांना संपवणारा भेकड आतंकी शिखंडीसारखा कुठल्या बिळात लपला आहे? बहुजन समाजाच्या तरुणांचे हात वापरणारा, त्यांना सुपार्‍या देवून आपले इप्सित साध्य करणारा कारस्थानी मेंदू  पुढचे कोणते आडाखे रचण्यात व्यस्त आहे? आणि महाराष्ट्रातील आम्ही तमाम जनता या कारस्थान्याचा खुनात रंगलेला भेजा किती काळ सहन करणार आहोत? की आम्ही फक्त मोजत रहायचे? काल एवढे मारले, उद्या तेवढे मारणार? आणि मुडद्यांच्या राशीवर लोळण घेत त्याने फक्त ‘अंधेरा कायम रहेगा, आतंक अपना काम करेगा’ हीच डरकाळी फोडत रहायची आणि आम्ही मात्र ‘जवाब दो’ म्हणत ‘आम्ही सारे दाभोलकर’ होवून न्यायाची अपेक्षा करत रहायची. दाभोलकरांनी उभी हयात शांततेचा पुरस्कार केला म्हणून दाभोलकरांना व त्यांच्या विचारांना संपवू पहाणार्‍यांना माफ करायचं? शक्य नाही! दाभोलकर, एकवेळ तुम्ही माफ केलं असतं पण जनता त्यांना माफ करु शकत नाही. भलेही विचारांची लढाई विचाराने लढावी अशी आपली शिकवण असली तरी ज्या मार्गाचा पुरस्कार त्यांनी केला त्यांना तशीच सजा मिळाली पाहिजे. 

‘फैला हुआ था उजाला, सब लोग जाग रहे थे 
और सितमगर कत्ल करके  बंदुक छिपा रहे थे’  

हे जरी खरं असलं तरी या सार्‍यांना बंदुक पुरवणारा कोण होता? रिव्हॉल्वर तयार करणारा कोण होता? की ज्यांचे शस्त्रसाठे मिळाले ते सारेच या षड्यंत्रामध्ये वापरले गेले? मग षड्यंत्राचा खरा सूत्रधार कोण? ‘कौन है ओ मास्टर माईंड?’ याचा शोध सीबीआयने घेतलाच पाहिजे. केवळ या कळसुत्र्या बाहुल्यांना व सुपार्‍या वाजवणार्‍यांना अटक करुन दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या हत्येच्या तपासाला पूर्णत्व येत नसते. हत्येच्या ‘मास्टर माईंड’पर्यंत सीबीआयला पोहोचावेच लागेल. तसे झाले नाही तर महाराष्ट्रातील जनतेचा कोणत्याच यंत्रणेवर विश्‍वास राहणार नाही. हिंदुत्ववादाचा पदर घेवून सत्तेवर आरुढ असलेल्या सरकारमधील काहींना आपले निष्कलंकत्व सिद्ध करण्यासाठी पारदर्शी काम करणार्‍या अधिकार्‍यांना स्वातंत्र्य द्यावे लागेल. हिंदुत्वाच्या आड अतिरेकी कारवाया कोण करत असेल तर त्यांचे बुरखे टराटरा फाडण्यासाठी सरकारलाही अशा यंत्रणांच्या पाठीशी पाठबळ उभे करावे लागेल. तरच ‘मास्टर माईंड’च्या  गळ्याला तपासाचे नख लागेल. तोपर्यंत ‘आम्ही सारे दाभोलकर’ ओरडत राहू, बोलत राहू, आरोळ्या ठोकत राहू, आंदोलने करत राहू, ‘जवाब दो... जवाब दो.... जवाब दो... मास्टर माईंड कौन है जवाब दो...!’

 हरीष पाटणे