Sat, Jun 06, 2020 05:45होमपेज › Satara › सातार्‍यात बनावट सर्पमित्रांकडून विषाची तस्‍करी (व्हिडिओ)

सातार्‍यात बनावट सर्पमित्रांकडून विषाची तस्‍करी (व्हिडिओ)

Published On: Dec 30 2017 7:50PM | Last Updated: Dec 30 2017 10:55PM

बुकमार्क करा
सातारा : प्रतिनिधी

दोन मांडूळ व नाग जातीच्या सापाच्या विषाची तस्करी केल्याप्रकरणी सर्पमित्र म्हणून वावरणार्‍या तिघांना अटक करण्यात आली असून मांडूळ व विष असा सुमारे 12 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. दरम्यान, यामागे मोठी टोळी कार्यरत असण्याची शक्यता आहे.

विनोद विजय राऊत (वय 26, रा. कवडेवाडी, पो. हिवरे ता. कोरेगाव), रोहित अर्जुन कायंगुडे (21, रा. सुलतानपूर, ता. वाई दोघे जि. सातारा) व सागर रवींद्र साठे (26, रा.भावापूर, ता. हवेली, पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, सातारा जिल्ह्यात मांडूळ व नागाच्या विषाची मोठी तस्करी होत असल्याची माहिती एलसीबीच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार सातारा येथील मोळाचा ओढा येथे शनिवारी अशा वन्य जीवाची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला. पोलिसांचा वॉच असतानाच दोन दुचाकीवर तीन युवक संशयितरीत्या घुटमळत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. संशयितांकडे पोलिसांनी चौकशी केल्यानंतर व झडती घेतल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली.

संशयित युवकांकडे पिशव्यांमध्ये दोन मोठी मांडूळ व एक बाटली होती. पोलिसांनी त्याबाबत विचारणा केल्यानंतर दोन मांडूळ व बाटलीमध्ये नागाचे विष असल्याची कबुली दिली. यावेळी पोलिसांनी दोन दुचाकी, तीन मोबाईल असा मुद्देमालही जप्त केला.  मांडूळप्रकरणी पंधरा दिवसांपूर्वीच एलसीबीच्या पथकाने कारवाई केली आहे. आणखी दोन मांडूळ व विष सापडल्याने यामागे मोठी टोळी कार्यरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, नागाचे विष पकडले जाण्याची  ही पहिलीच कारवाई मानली जात आहे.

जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक विजय पवार, पोनि पद्माकर घनवट, यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार शशिकांत मुसळे, फौजदार सागर गवसणे, पोलिस हवालदार पृथ्वीराज घोरपडे, विलास नागे, संजय पवार, ज्योतीराम बर्गे, मोहन नाचण, रविंद्र वाघमारे, योगेश पोळ, नितीन भोसले, राजकुमार ननावरे, संतोष जाधव, प्रवीण कडव, राहूल कणसे, मारुती अडागळे, गणेश कचरे यांनी कारवाईत सहभाग घेतला.