Sat, Jul 04, 2020 14:10होमपेज › Satara › कराड, पाटण तालुक्यात कोरोनाचे ६ नवे रुग्ण

कराड, पाटण तालुक्यात कोरोनाचे ६ नवे रुग्ण

Last Updated: May 26 2020 10:44PM

file photoकराड : पुढारी वृत्तसेवा

कराड आणि पाटण तालुक्यात मंगळवारी रात्री सहा नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची भर पडली. यात कराड तालुक्यातील वानरवाडी आणि पाटण तालुक्यातील सदू वरपेवाडी (सळवे) येथील चार रुग्णांचा समावेश आहे. तर उंब्रज आणि नवरस्ता येथेही दोघांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे कराड तालुक्यात आता 148 तर पाटण तालुक्यात 33 कोरोनाग्रस्त रुग्ण झाले आहेत.

कराड तालुक्यातील वानरवाडी येथे यापूर्वी एकाच कुटुंबातील पाच लोकांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यात मंगळवारी रात्री आणखी दोघांची भर पडली. त्यामुळे म्हासोलीप्रमाणेच वानरवाडी हे गाव आता कोरोनाचा कराड तालुक्यातील नवा हॉस्पॉट म्हणून समोर आले आहे. त्याचबरोबर उंब्रजमध्येही आणखी एकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यापूर्वी कराड तालुक्यात सुमारे 145 कोरोना रुग्ण होते. त्यामुळे ही संख्या आता 148 इतकी झाली आहे.

दरम्यान, पाटण तालुक्यात कोरोनाचे आता 33 रूग्ण झाले आहेत. तालुक्यात मंगळवारी रात्री नवारस्ता परिसरातील एका व्यक्तीसह सदू वरपेवाडी (सळवे) परिसरातील दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे वैद्यकीय अहवालावरून समोर आले. पाटण तालुक्यातील डेरवण परिसरातील चिमुकल्याने यापूर्वीच कोरोनावर मात केली आहे. तर एका रुग्णाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यामुळेच सद्यस्थितीत तालुक्यातील 31 कोरोनाग्रस्त रूग्णांवर कराडला रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मंगळवारी सहा नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची भर पडल्याने सातारा जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आता 342 इतकी झाली आहे.