Wed, Feb 26, 2020 21:32होमपेज › Satara › उदयनराजेंवरून मुख्यमंत्र्यांचा शिवसेनेवर पलटवार

उदयनराजेंवरून मुख्यमंत्र्यांचा शिवसेनेवर पलटवार

Published On: Sep 16 2019 11:51AM | Last Updated: Sep 16 2019 1:03PM
कराड: पुढारी ऑनलाईन

साताऱ्याचे माजी खासदार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज उदयनराजे भोसले यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. उदयनराजेंच्या पक्षप्रवेशाच्या पार्श्वभूमीवर बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. भाजपमध्ये प्रवेश केला त्यामुळे आता उदयनराजे यांना शिस्तीचे वळण लागत आहे. असा खोचक चिमटा शिवसेनेने उदयनराजेंचा काढला. यांच्या या प्रतिक्रीयेला प्रतित्युत्तर देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उदयनराजेंची पाठराखण केली. उदयनराजे हे 'मुक्त विद्यापीठ' आहेत असे फडणवीस यांनी यावेळी म्हटले.

'सामना' हे केवळ वृत्तपत्र आहे, आपण सगळे पत्रकार आहात, अनेकजण लिहितात, प्रश्न विचारतात. मात्र, प्रत्येकाच्या प्रश्नाला मी उत्तर द्यायचं का? असा प्रतिप्रश्न फडणवीस यांनी पत्रकारांना केला. तसेच, उदयनराजे हे मुक्त विद्यापीठ आहेत. कॉलर उडवणे हे त्यांची स्टाईल आहे. त्यांना जिथं वाटतं तिथे ते कॉलर उडवतात. त्यांच्यासारखं प्रत्येकाला जमत नाही. ते व्यासपीठावर असले की तसे करत नाहीत. ते जनतेमध्ये, तरुणांमध्ये असल्यानंतरच तसं करतात. कारण, त्यांची ही स्टाईल तरुणाईला आवडते. मला कॉलर उडवणं जमतं का, अन् ते जमणारही नाही, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी उदयनराजेंची पाठराखण करत शिवसेनेवर पलटवार केला.

शिवसेनेने 'अमित शहा किंवा पंतप्रधान मोदी व्यासपीठावर असताना शिटय़ा मारणे, कॉलर उडवणे, इतर नाटय़छटा करणे हे असले प्रकार भाजपच्या शिस्तीत बसत नाहीत (शरद पवारांनी हे खपवून घेतले हा त्यांचा बेशिस्तपणा) याची कल्पना देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांनी सातारच्या राजांना एव्हाना दिली असेल. उदयनराजेंनी दिल्लीत जाऊन हायकमांडच्या आशीर्वादाने भाजपचा रस्ता पकडला व भाजपात प्रवेश घेताना त्यांनी कॉलरही त्यावेळी उडवली नाही. याचा अर्थ असा की उदयनराजे यांना शिस्तीचे वळण लागत आहे, त्यामुळे त्यांचे अभिनंदन!' असे आजच्या अग्रलेखात म्हटले होते.