Wed, May 22, 2019 16:16होमपेज › Satara › पाटण : मल्हारपेठेत आमदार देसाई यांना धक्का

पाटण : मल्हारपेठेत आमदार देसाई यांना धक्का

Published On: May 28 2018 8:13PM | Last Updated: May 28 2018 8:13PMमारूल हवेली (जि. सातारा): वार्ताहर

देसाई गटाची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या मल्हारपेठ ( ता.पाटण ) ग्रामपंचायतीच्या सरपंच पदावर शिवसेना जिल्हाप्रमुख हर्षद कदम यांनी बाजी मारली आहे. पाटणकर गटाने ७ जागेवर तर, देसाई गटाने चार जागेवर विजय संपादन केला. या निकालाने देसाई गटावर बालेकिल्ल्यात पराभवाची नामुष्की ओढावली असून, पाटणकर गटासाठी ‘गड आला पण सिंह गेला' अशी आवस्था झाली आहे.
अत्यंत अटी तटीच्या झालेल्या मल्हारपेठच्या ग्रामपंचायत  निवडणूकीत प्रस्थापितांना धक्का देणारा निकाल लागला आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हर्षद कदम यांनी तिसरे पॅनेल उभे करून दोन्ही गटासाठी आव्हान उभे केले होते. त्यामुळे ही निवडणूक रंगतदार अवस्थेत होऊन त्याच्या निकालाकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. हर्षद कदम यांची पत्नी धनश्री कदम यांची सरंपद पदी निवड झाली. पाटणकर गटातील नवनाथ चिचंकर, निलेश चव्हाण, ज्योती पवार, भाग्यश्री हिरवे, अवधूत कांबळे, सुषमा चव्हाण, संगिता वाघ तर, देसाई गटातून जयवंत पानस्कर, रेखाताई भिसे, जगन्नाथ पवार, तेजश्री शेटे या उमेदवारांनी विजय मिळविला.

मल्हारपेठ मधील निकालाने प्रस्थापितांच्या पायाखालची वाळू सरकली असून, हर्षद कदम यांनी सरपंच पदावर वर्चस्व राखले आहे. या निवडणुकीत देसाई गटासह हर्षद कदमांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. जिल्हा परिषद निवडणुकीत देसाई गटाने हर्षद कदमांच्या विरोधात केलेल्या पराभवाचा वचपा काढला असून, देसाई गटाला दणका दिला असल्याची चर्चा सुरू होती. तर देसाई व पाटणकर गटात अटीतटीची लढत होऊन थोड्या मतांनी काही जागेवर विजय संपादीत केला आहे. माजी जि. प. सदस्य आर.बी. पवार, पं.स.सदस्य सुरेश पानस्कर, देसाई कारखान्याचे संचालक अशोक डिगे, सरंपच गौरीहर दशवंत या देसाई गटातील स्थानिक मातब्बर नेत्यांचा करिश्मा यावेळी चालला नाही. तर देसाई गटात असणारा विस्कळीतपणा निकालावर परिणाम करणारा ठरला. देसाई गट व हर्षद कदम यांच्यातील मतभेदाचे पडसाद याही निवडणूकीत दिसून आले.

दरम्यान, या विजयानंतर हर्षद कदम समर्थकांनी फटक्यांची आतिषबाजी करत गुलाल उधळून जल्लोष साजरा केला.