Wed, Jul 17, 2019 20:44होमपेज › Satara › गर्दी पहा, कुणी स्वतःला सातारचा मालक समजू नये : शिवेंद्रराजे

गर्दी पहा, कुणी स्वतःला सातारचा मालक समजू नये : शिवेंद्रराजे

Published On: Apr 08 2018 11:14PM | Last Updated: Apr 08 2018 11:38PMसातारा ः प्रतिनिधी

गांधी मैदानावरील सभेला आ. शिवेंद्रराजेंनी अभूतपूर्व गर्दी जमवली होती. शिवेंद्रराजे भाषणाला उठल्यानंतर तरूणांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. याच घोषणाबाजीत त्यांचे भाषण सुरू झाले. शिवेंद्रराजे नेहमीच्या संयमी भाषेने बोलतील असे वाटत असतानाच शिवेंद्रराजेंनी पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला. ते म्हणाले, अजितदादा, गर्दी पहा, तुम्ही म्हणत होता रॅली नको सभेला उशीर होईल पण आम्हालाही तुम्हाला दाखवून द्यायचे होते सातार्‍यात आजही राष्ट्रवादी व स्व. भाऊसाहेब महाराजांचे विचार जिवंत आहे. त्यामुळे मी सातार्‍याचा मालक आहे, असे कुणीही समजू नये.

शिवेंद्रराजेंनी भाषणाच्या सुरूवातीलाच खा. उदयनराजेंचे नाव न घेता त्यांच्यावर हल्ला चढवला. ते म्हणाले, प्रत्येक कार्यकर्ता राष्ट्रवादीच्या पाठिशी भक्कमपणे उभा आहे, हे दाखवण्यासाठी रॅली काढणे गरजेचे होते. सातारा जिल्ह्याचे राजकीय चित्र वेगळे दाखवले जात आहे. पण हे चित्र कशाने वेगळे दाखवले जात आहे याचा विचार करण्याची दादा तुमची जबाबदारी आहे. सातार्‍यात  चूल आम्ही मांडायची, सरपण आम्ही आणायचे, काडीपेटी आम्ही आणायची, स्वयंपाक आम्ही करायचा आणि जेवायच्या पंक्तीला दुसराच येवून बसणार, आमच्या आधी ताव मारणार आणि कसे बनवले जेवण हे सांगत सुटणार हे यापुढे सहन  करणार नाही. त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांची घुसमट होत आहे. पक्षाने याचा विचार केला पाहिजे, अशा शब्दात आ. शिवेंद्रराजे यांनी खा. उदयनराजेंवर हल्लाबोल चढवला. 

शिवेंद्रराजेंच्या भाषणाचा संदर्भ देत आ. जयंत पाटील म्हणाले, आ. शिवेंद्रराजेंना मी वरिष्ठ आहे. ते तरूण आहेत. पूर्वी ते सर्व गोष्टी समजूतीने घेत होते. मात्र, आता ते कधी नव्हे इतके आक्रमक झाले आहेत. सातार्‍यात निघालेली रॅली आणि गर्दीमुळे त्यांचा आक्रमकपणा दिसत आहे. हा आक्रमकपणा कायम ठेवण्यासाठी त्यांनी त्यांची दाढी तशीच ठेवावी.यापुढे जो आडवा येईल, त्याची बिन पाण्याने करायची तयारी आ. शिवेंद्रराजे यांनी ठेवावी.