होमपेज › Satara › मुंबई, पुणे व सातार्‍यात तंत्रज्ञान विकसन केंद्रे 

मुंबई, पुणे व सातार्‍यात तंत्रज्ञान विकसन केंद्रे 

Published On: May 10 2018 2:02AM | Last Updated: May 09 2018 11:27PMसातारा : प्रतिनिधी

रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी वर्षात पाऊल टाकताना नवीन उपक्रम हातामध्ये घेण्याचे सूत्र आपण स्वीकारले आहे. हा एक मोठा कार्यक्रम हातामध्ये घेत असून मॅनेजिंग कौन्सिलच्या बैठकीमध्ये त्याला मान्यता दिली आहे. आपण  इन्व्हेशन, इनोव्हेशन आणि इन्स्ट्रब्यूशन या तीन क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी टाटा टेक्नॉलॉजी सिंगापूर यांच्याबरोबर संस्थेने करार केला असून ज्ञानाबरोबर तंत्रज्ञानालाही संस्थेने प्राधान्य देण्याचा कृती कार्यक्रम प्रत्यक्ष सुरू केला  आहे.  मुंबई, पुणे व सातारा येथे याबाबतची तंत्रज्ञान विकसन केंद्रे लवकरच सुरू होतील. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर रयतचा नावलौकिक होईल, असे प्रतिपादन खा. शरद पवार यांनी केले.   

रयत शिक्षण संस्थेच्यावतीने पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमास विधान परिषदेचे सभापती ना. रामराजे ना. निंबाळकर, आ. गणपतराव देशमुख, दिलीप वळसे-पाटील, आ. अजित पवार, खा. सुप्रिया सुळे, बबनराव पाचपुते, आ. शिवेंद्रराजे भोसले, आ. शशिकांत शिंदे, आ. मोहनराव कदम, आ. प्रशांत ठाकूर, जि.प.अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर,डॉ .एन.डी. पाटील, चेअरमन डॉ. अनिल पाटील, रामशेठ ठाकूर व पदाधिकारी उपस्थित होते. 

खा. शरद पवार म्हणाले, ही संस्था टाटा कंपनीची असून इंजिनिअरींग आणि तंत्रज्ञान या दोन क्षेत्रातील अग्रगण्य अशी संस्था आहे. ती डिझायन, उत्पादन प्रक्रिया व्यवस्थापन, वस्तू उत्पादन क्षेत्र या विभागामध्ये काम करते. कंपन्यांसाठी ट्रेनिंग देते. सपोर्टेड असे काम करते. या कंपनीच्या माध्यमातून उत्तर अमेरिकेत, युरोप, आशिया खंडातील देशात मोठे काम झाले आहे. एक सेंटर उभे करावयाचे असेल तर 22 कोटी रुपये लागतात. या सेंटर उभारणीसाठी 22 कोटीपैकी 2 कोटी रुपये संस्थेला उभे करावे लागतील तर 16 कोटी रुपयांचे अनुदान टाटा कंपनी देणार आहे. त्यासाठी संस्थेच्या कार्यक्षेत्रामध्ये तीन सेंटर काढण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. त्यानुसार खारघर नवी मुंबई, हडपसर पुणे व सातारा येथे तर चौथे अहमदनगर  येथे उभारले जाणार आहे. त्यापैकी पहिल्या तीन सेंटरसाठी प्रत्येकी 2 कोटी रुपये उभे करावे लागतील. या संस्थेच्या 3 सेंटरमधून पुढील 5 वर्षामध्ये प्रत्येक सेंटरचे जे काम होते त्यातून उत्पन्न मिळणार आहे. ते 10 कोटी रूपये अपेक्षित असून या उत्पन्नातला एक नवा पैसाही आम्ही घेणार नाही. ते सेंटर उभं करून रयत व एसटीपीकडे हस्तांतरीत केले जाईल याची खबरदारी ते घेणार आहेत. नवउद्योजकांना ट्रेनिंग देणे, उच्चदर्जाच्या तंत्रज्ञानांना मार्गदर्शन करणे, नवनिर्मिती करणार्‍या उद्योजकांना व्हेंचरशिप देणे हा सगळा कार्यक्रम या सेंटरच्यावतीने घेतला जाणार आहे. 

एज्युकेशन हे पायाभूत एज्युकेशन असले पाहिजे. त्यासाठी  शिक्षणाचा व शाळेचा दर्जा चांगला असायला पाहिजे. ते सगळे कामकाज या माध्यमातून  करण्याची संकल्पना आज आपण या ठिकाणी घेतली. हा उपक्रम शताब्दी वर्षाच्यानिमित्ताने हातामध्ये घेतल्यामुळे महाराष्ट्र व देशातील ग्रामीण भागामध्ये शैक्षणिक क्षेत्राला दिशा देण्याचे काम रयत शिक्षण संस्था करत असल्याचा इतिहास निर्माण होईल, असेही ते म्हणाले.

शेतीक्षेत्रात  आधुनिक ज्ञान कसे मिळेल त्यादृष्टीने प्रकल्प उभे करत आहोत. हळूहळू शेती क्षेत्राचा विस्तार करण्यासाठी भागीदार शोधण्याचे काम  रयतमार्फत सुरू आहे. शेती उत्पादन देशांतर्गत वाढले आहेत. तांदूळ, गहू उत्पादन व निर्यात करण्यात देश अग्रेसर आहे. याचे श्रेय शेतकरी व शास्त्रज्ञांचे आहे, असे सांगून खा. पवार पुढे म्हणाले, संस्थेचा शताब्दी कार्यक्रम महाराष्ट्र पातळीवर शक्यतो देशाच्या पातळीवरसुध्दा राष्ट्रीय नेत्यांना घेवून करावा. अनेक विद्यार्थी -विद्यार्थिनी या संस्थेतून बाहेर पडले असून भारताच्या बाहेर अनेक देशांमध्ये विविध प्रकारच्या जबाबदार्‍या  ते सांभाळत आहेत.  त्यांच्याशीही संपर्क साधून त्यांच्याशी कसा सहयोग वाढवता येईल, याची काळजी घेतली जाईल.

यावेळी संस्थेच्यावतीने डॉ. अमृता पटेल व डॉ. चारूदत्त मायी यांचा राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. पुरस्कारानंतर दोन्ही मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.चेअरमन डॉ. अनिल पाटील यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा सांगितला. यावेळी देणगीदार,  गुणवंत विद्यार्थी व संस्थांचा सत्कार करण्यात आला. संस्थेचे सचिव डॉ. भाऊसाहेब कराळे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. सहसचिव विलास महाडिक यांनी गुणवंतांच्या अहवालाचे वाचन केले. सहसचिव व्ही.एस. सावंत यांनी आभार मानले. प्रा. शिवलिंग मेनकुदळे यांनी सुत्रसंचालन केले. प्रारंभी खा. शरद पवार व मान्यवरांनी कर्मवीर अण्णांच्या समाधीस अभिवादन केले. 

यावेळी सुभाषराव शिंदे, उद्योजक हणमंतराव गायकवाड, राजेंद्र जगदाळे, डॉ. विश्‍वजीत कदम, प्रभाकर देशमुख, चंद्रकांत दळवी, रविंद्र बेडकीहाळ, रयत संस्थेचे पदाधिकारी व रयत सेवक उपस्थित होते. 

तुम्ही वर येताय की मी खाली येऊन बसू, आ. अजित पवारांचे आ. शिवेंद्रराजेंवरचे प्रेम
कर्मवीर पुण्यतिथीनिमित्त व्यासपीठावर मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. मान्यवरांसाठी व्यासपीठावर खुर्च्या मांडण्यात आल्या होत्या तर निम्म्या व्यासपीठावर भारतीय बैठक व्यवस्था केली होती. त्यावेळी आ. शिवेंद्रराजे भोसले, खा. सुप्रिया सुळे, आ. शशिकांत शिंदे यांच्यासह सर्वजण भारतीय बैठक मारून बसले होते. आ. अजित पवार यांच्या अचानक लक्षात ही गोष्ट आल्यानंतर ते ताडकन उभे राहिले. संयोजकांना खुर्च्या टाकण्याच्या सूचना केल्या. आ. शिवेंद्रराजेंकडे पाहत त्यांनी जवळ येऊन बसण्याची सूचना केली. मात्र, शिवेंद्रराजेंनी नकारार्थी मान हलवली. त्यावर तिथूनच त्यांना अजितदादा म्हणाले, ‘तुम्ही इथे वर येऊन बसतायं की मी खाली येऊन बसू.’ अजितदादांच्या या प्रेमाच्या आग्रहास्तव शिवेंद्रराजे खुर्चीत येऊन बसले आणि दोघांनी एकमेकांना नमस्कार केला व दोघेही दिलखुलास हसले. यानिमित्ताने अजित पवारांचे शिवेंद्रराजेंवरचे प्रेम पुन्हा एकदा उठून दिसले. 

तेवढे कमळाबाईला बाजूला ठेवा..!
डॉ. मायी यांनी  आपल्या भाषणात शेवटी संस्कृतमध्ये  काही सांगितलं मात्र, मला काही संस्कृत येत नाही. त्यांनी संस्कृतमध्ये कमल, कमळ असा उल्लेख केला मात्र कमळ म्हटल्यांवर आम्हाला त्रास होतो, अशावेळी नेहमी बाळासाहेब ठाकरेंची आठवण  होते. बाळासाहेबांनी सांगितलं होतं तेवढे कमळाबाईला बाजूला ठेवा. कमळाबाईचे ते कमळ व  यांना सांगायचे कमळ वेगवेगळे आहे, असे मी समजतो असा उल्लेख खा. शरद पवार यांनी आपल्या भाषणात केल्यावर एकच हशा पिकला. 

डॉ. पतंगराव कदमांची उणीव 
9 मे हा दिवस डॉ. पतंगराव कदम व एस.एम. पाटील हे कधीही नाहीत हे असं गेल्या 25 वर्षात कधी झालं नाही. पतंगराव नेहमी संस्थेच्या कामाची जबाबदारी घेणार त्यांनी आपल्या आयुष्याची सुरूवात रयत संस्थेमधून केली. शेवटपर्यंत त्यांनी संस्थेची बांधिलकी कधी  सोडली नाही. ते आज आपल्यात नाहीत त्यामुळे अस्वस्थ  आहोत, असे उद्गार खा. शरद पवार यांनी काढले. मात्र  सर्व कार्यक्रमात  डॉ. पतंगराव कदमांची उणीव दिसून येत होती. पतंगरावांचे बंधू आ. मोहनराव कदम हे व्यासपीठावर बसले होते तर त्यांचे चिरंजीव विश्‍वजित कदम हे खाली गादीवर विनयाने बसले होते. या निमित्ताने कदम परिवाराची रयत शिक्षण संस्थेवरील आस्थाही दिसून आली. 

सुप्रियाताईंनी उठवले दादांना सत्काराला
रयत शिक्षण संस्थेच्या वतीने थोर देणगीदारांचा सत्कार खा. शरद  पवार यांच्या हस्ते करण्यात येत होता. यावेळी पवार चॅरिटेबल ट्रस्टने रयत शिक्षण संस्थेला दिलेल्या 50 लाखांच्या देणगीबद्दल  खा. सुप्रिया सुळे यांचे सत्कारासाठी नाव पुकारण्यात आले. मात्र, सुप्रिया सुळे यांनी  सत्काराला उठताच आ. अजित पवार यांना हाताला धरून उठवून नेत आपल्या मनाचा मोठेपणा दाखवून दिला. डॉ. अनिल पाटील यांच्या हस्ते दोघांचाही सत्कार करण्यात आला. 

अजितदादांकडून सुमनताईंचाही सन्मान
कार्यक्रम सुरू असताना आ. अजित पवारांचे सर्वत्र लक्ष होते. संयोजनामधल्या त्रुटी ते पाहत होते. खुर्च्यांची व्यवस्था बघत होते. त्याचवेळी त्यांची नजर खाली रयत सेवकांमध्ये बसलेल्या माजी गृहमंत्री दिवंगत आर.आर. पाटील यांच्या पत्नी  आ. सुमनताई पाटील यांच्याकडे गेली. त्यांनी लगेचच कार्यकर्त्यांना आ. सुमनताई पाटील यांना व्यासपीठावर सन्मानाने घेऊन येण्याच्या सूचना केल्या. दादांच्या आग्रहास्तव सुमनताईही व्यासपीठावर येऊन बसल्या. 
 

Tags : karmaveer bhaurao patil, sharad pawar, satara