Fri, Jan 18, 2019 00:39होमपेज › Satara › बुद्धिमत्ता ठराविक लोकांची मक्तेदारी नाही : शरद पवार 

बुद्धिमत्ता ठराविक लोकांची मक्तेदारी नाही : शरद पवार 

Published On: May 11 2018 1:44AM | Last Updated: May 10 2018 11:29PMसातारा : प्रतिनिधी

समाजातील उपेक्षितांना सन्मानाने जगवण्यासाठी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि कर्मवीर आण्णांनी आयुष्य वाहून घेतले. त्या काळातही त्यांच्या ध्येयवादी पुरोगामी विचारांवर आणि वैयक्तिक जीवनावर काही प्रस्थापितांनी हल्ला केला होता. आजही असे अनेक घटक समाजामध्ये असून त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. आपल्या उदात्त ध्येयवादी विचारातून भावी पिढी सक्षम करा. शिक्षण, कर्तव्य आणि बुध्दिमत्ता ठराविक लोकांचीच मक्तेदारी नाही, असे प्रतिपादन खा. शरद पवार यांनी व्यक्त केले. 

जकातवाडी, ता. सातारा येथील फुले-आंबेडकर साहित्य पंचायत भटक्या विमुक्त जमाती संघटना व भारतीय भटके विमुक्त विकास संशोधन संस्था यांच्यावतीने आयोजित पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. यावेळी खा. पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार, कन्या खा. सुप्रिया सुळे व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

खा. पवार म्हणाले, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर हल्ला करून  त्यांना या जगातून घालवले. परंतु, त्यांचे विचार अजरामर असून खोट्या गोष्टीतून संपूर्ण समाजव्यवस्था बदनाम करण्याचा काही  प्रस्थापित घटकांकडून डाव पहायला मिळत आहे. परंतु, अशा संकटावेळी आपला विचार, भूमिका आणि संघटीत समाज वर्ग पाठिशी असला की कितीही संकटे आली तरी भोके पडत नाहीत. 

आज ग्रामीण भागात विद्यार्थी आपल्या ज्ञान व कर्तृत्वातून संधी मिळाली की उभी राहतात. यासाठी शिक्षकांचीही मोठी जबाबदारी आहे. सरकार शिक्षणावर लाखो रूपये खर्च करते पण त्या पध्दतीने शिक्षण दिले जात नाही. आई-बापच वंगाळ तर मुले वंगाळ होणार नाहीत अशी भूमिका शिक्षकांनीच घेतली असेल तर ती भावी पिढीसाठी धोकादायक आहे. देश घडवण्यसाठी ज्ञान संपन्न पिढी उभी करण्याचे काम करणार्‍या या संस्थेच्या पाठिशी मी खंबीरपणे उभा असल्याची ग्वाही खा. पवार यांनी दिली. लक्ष्मण माने यांनी प्रास्ताविक केले. यावेळी सदा डुंबरे, मच्छिंद्रनाथ जाधव, विलास माने यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी खा. पवार यांच्या हस्ते जकातवाडी डिजीटल ग्रामपंचायत करण्यात आली.