Fri, Jun 05, 2020 11:41होमपेज › Satara › सातारा लोकसभेसाठी श्रीनिवास पाटील 

सातारा लोकसभेसाठी श्रीनिवास पाटील 

Published On: Sep 23 2019 1:58AM | Last Updated: Sep 22 2019 10:44PM
सातारा : प्रतिनिधी

सातारा लोकसभेची पोटनिवडणूक अचानक लागलीच, तर राष्ट्रवादीतर्फे भाजपच्या उदयनराजेंविरोधात माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या नावाबाबत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी रविवारी दिवसभरात चाचपणी केली. राष्ट्रवादीच्या आमदारांनीही श्रीनिवास पाटील यांच्यासाठीच आग्रह धरला. त्यामुळे ऐनवेळी निवडणूक आयोगाने लोकसभेची घोषणा केली, तर श्रीनिवास पाटील हे उदयनराजेंविरोधातील उमेदवार ठरण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीतून खासदारकीचा राजीनामा देऊन उदयनराजेंनी भाजपमध्ये प्रवेश केला. विधानसभेच्या निवडणुकीबरोबर लोकसभेची निवडणूक लागेल अशी अटकळ होती; मात्र निवडणूक आयोगाने लोकसभेची पोटनिवडणूक जाहीर केली नाही. असे असले तरी येत्या दोन-तीन दिवसांत या पोटनिवडणुकीची घोषणाही होण्याची शक्यता गृहीत धरून शरद पवारांनी सातार्‍यात रविवारी उदयनराजेंविरोधात कोण लढू शकेल याची चाचपणी केली. त्यासाठी जिल्ह्यातील विविध संघटनांच्या प्रमुखांना, पक्षाच्या आमदारांना, पदाधिकार्‍यांना पवारांनी स्वत: निमंत्रित केले. त्यांच्याकडून बदलत्या राजकीय परिस्थितीचा कल जाणून घेतला तेव्हा

बहुतांश जणांनी श्रीनिवास पाटील यांचेच नाव सांगितले. पवारांनी रयत शिक्षण संस्थेच्या जयंती सोहळ्यापासून श्रीनिवास पाटील यांना सोबत घेतले. सातार्‍यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या भव्य रॅलीत शरद पवार यांच्यासोबत श्रीनिवास पाटील पूर्णवेळ उभे होते. रयत शिक्षण संस्थेच्या जयंती सोहळ्यात श्रीनिवास पाटील यांनी भाषण ठोकलेच. कल्याण रिसॉर्टच्या मेळाव्यात पवारांनीच श्रीनिवास पाटील यांना बोलायला लावले.एकप्रकारे पवारांना श्रीनिवास पाटील यांची तब्बेत ठिक आहे का  याचीच तपासणी करायची होती. दिवसभरात आमदारांनी श्रीनिवास पाटील यांच्या नावाचा आग्रह धरला आणि पवारांनीही त्यांची परीक्षा घेतली. त्यात श्रीनिवास पाटील खरे उतरले. भाषण करायला ते उभे राहिले तेव्हाही जमलेल्या विराट जनसमुदायाने त्यांच्या नावाच्या घोषणा केल्या. यावेळी जनतेतून भावी खासदार असाही जयघोषही झाला. मेळाव्यानंतर पवारांनी आमदार व पदाधिकार्‍यांची  बैठक घेतली. या बैठकीतही जर लोकसभा लागलीच तर श्रीनिवास पाटील यांना तयार राहण्याच्या सूचना केल्या गेल्या. 

शरद पवार यांनी विधानसभा मतदारसंघनिहाय उमेदवारांची चाचपणीही केली. सातारा विधानसभेसाठी दीपक पवार यांचे नाव जवळपास निश्‍चित करण्यात आले. वाई विधानसभेसाठी मकरंद पाटील, कोरेगाव विधानसभेसाठी शशिकांत शिंदे, कराड उत्तर विधानसभा मतदार संघासाठी बाळासाहेब पाटील, पाटण विधानसभा मतदार संघासाठी सत्यजीत पाटणकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. रामराजे ना. निंबाळकर यांच्याशी चर्चा करून फलटणबाबत निर्णय घेण्याचे ठरले. माण विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादीने लढवण्याबाबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सुतोवाच केले आहे. प्रभाकर देशमुख, प्रभाकर घार्गे की संदीप मांडवे यापैकी उमेदवार कोण? याची चर्चा होणार आहे.