Tue, Mar 26, 2019 21:56होमपेज › Satara › राहुल गांधींचे विधान म्हणजे ‘बाजारात तुरी : शरद पवार 

राहुल गांधींचे विधान म्हणजे ‘बाजारात तुरी’ : पवार 

Published On: May 10 2018 2:02AM | Last Updated: May 10 2018 2:02AMसातारा : प्रतिनिधी

काँग्रेसच्या जास्त जागा निवडून आल्या, तर मी पंतप्रधान व्हायला तयार आहे, या राहुल गांधी यांच्या विधानावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी शेतकरी भाषेत चिमटा काढला. देशातील निवडणुकांचा ट्रेंड सध्या बदलाला अनुकूल आहे, असं मला जाणवतंय. मात्र, लगेच आम्ही कुणासोबत जाऊ, किती जागा येतील, या निष्कर्षापर्यंत येण्याचं माझं तरी निरीक्षण नाही. मी जातीवाचक म्हणत नाही, पण आमच्याकडे एक म्हण आहे, ‘बाजारात तुरी आणि कोण कुणाला मारी.’ पीक कसं लागलं आहे, ते येऊ द्या तरी. नंतर ठरवू, असे सांगत खा. शरद पवार यांनी सगळे पत्ते ओपन असल्याचे संकेत पुन्हा एकदा दिले.

रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर पुण्यतिथी सोहळ्यानंतर संस्थेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत आयोजित भरगच्च पत्रकार परिषदेत खा. शरद पवार बोलत होते. देशात भाजप वगळता इतर पक्ष  व सत्ताधारी भाजला विरोध करण्यात पुढाकार घेणारे अन्य पक्ष आहेत. अनेक राज्यांमध्ये काँग्रेससारख्या पक्षांचे स्थान आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, पंजाब, राजस्थान या राज्यांमध्येही काँग्रेस आहे. काँग्रेसव्यतिरिक्तही इतर पक्ष आहेत. ममतांच्या राज्यात तृणमूल काँग्रेस आहे. उत्तर प्रदेशात मायावती व अखिलेश यादव, आंध्र प्रेदशात चंद्राबाबू, तेलंगाणामध्ये चंद्रशेखर राव यांची नावे घ्यावी लागतात. बीजेपी सोडून असलेले पक्ष ज्यांना स्थान आहे; पण देशात ते सरसकट नाहीत. अशा पक्षांना सोबत घ्यायला हवे. एक अनुकूल परिस्थिती असल्याने काँग्रेसने काही गोष्टी मान्य करायला पाहिजेत. सरकार बनवण्याबद्दल आज भाष्य करणे शक्य नाही, असेही ते म्हणाले. 

राज्यात राष्ट्रवादीने काढलेल्या हल्लाबोल यात्रेचा आढावा घेतला, तर कसे चित्र आहे, असे विचारले असता खा. शरद पवार म्हणाले, राज्यातील जनतेला बदल हवा, ही लोकांची भावना आहे. सत्ताधारी पक्ष भाजप पक्ष बदलला पाहिजे, अशी लोकांची मानसिकता आहे. भाजप आणि शिवसेना या पक्षांनी राज्यातील जनतेला पूर्वी विश्‍वास दिला होता. 

आता हे दोन्ही पक्ष वेगळे लढले तर लोकांच्या मनात या दोन्ही पक्षांबद्दल विश्‍वास राहणार नाही. 
कुत्र्यांसारख्या उपमांचा वापर पंतप्रधान करत आहेत, याकडे लक्ष वेधले असता खा. शरद पवार म्हणाले, पंतप्रधानपद हे घटनात्मक पद आहे. आपल्या पदाचे महत्व कायम ठेवणे हे संबंधित व्यक्तीची जबाबदारी आहे. आम्ही जवाहरलाल नेहरु, इंदिरा  गांधी, राजीव गांधी यांची भाषणे ऐकली. मर्यादेबाहेर कधी कुठले पंतप्रधान बोलले नाहीत. पक्षाची भूमिका समोर ठेवून पूर्वीच्या पंतप्रधानांनी देशाचे प्रश्‍न सोडवले. पूर्वीच्या पंतप्रधानांनी हीच भूमिका घेतली.
ईव्हीएम मशीनमुळे भाजप सर्व निवडणुका जिंकत असल्याची चर्चा असून त्यामुळे सर्वांच्या मनात साशंकता निर्माण झाली आहे, असे   विचारले असता खा. शरद पवार म्हणाले, कर्नाटक निवडणुका पार पडल्यानंतर भाजप सोडून इतर पक्षाचे प्रतिनिधी एकत्र बसून चर्चा करणार आहेत. निवडणूक आयोगासोबतही चर्चा करुन लोकांच्या मनातील शंका दूर करण्यासाठी प्रयत्न केला जाईल.  ईव्हीम मशीनचा प्रश्‍न भारतापुरता मर्यादित नाही. जगात ज्या-ज्या ठिकाणी वापर केला गेला त्या देशांनी ईव्हीएम मशीन बंद केल्या. मतपत्रिकेतील मते ज्या पक्षांना टाकली जायची. ज्या विचारांची लोक होते ते त्या मतपेटीत मते टाकत होती. ही प्रक्रिया सोपी होती. गडबड व्हायची नाही. पण ईव्हीएम मशीन निघाल्यामुळे लोकांच्या मनात शंका निर्माण व्हायला लागल्या. संसदीय लोकशाहीमध्ये लोकांच्या मनातील संशय दूर करणे हे निवडणूक आयोगाचे कर्तव्य आहे. 

राज्य सरकार मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याबाबत उत्सुक दिसत नाही, याबाबत विचारले असता खा. शरद पवार म्हणाले, त्यांना मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याची इच्छा दिसत नाही किंवा धनगर समाजाला आदिवासी समाजाचा दर्जा देण्याचा विषय असेल. मुख्यमंत्र्यांनी बारामतीमधील भाषणात सत्ता  आल्यावर पंधरा दिवसांत धनगर आरक्षण देवू असे सांगितले होते. पण चार वर्षे झाली पण निर्णय घेतला नाही. पंतप्रधान तसेच मुख्यमंत्र्यांनी दिलेले  आश्‍वासन पाळले नाही. अशा सर्व कारणांमुळे देशात एकप्रकारचा चेंज आम्हाला दिसत आहे. 

दूध भुकटीमध्ये लिटरमागे 3 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे, त्याचा शेतकर्‍यांना किती फायदा होईल, असे विचारले असता खा. शरद पवार म्हणाले, राज्यातील 65 टक्के दूध हे सरकारी व सहकारी संस्थांबाहेरील आहे. दूध भुकटीसाठी लिटरला तीन रुपये अनुदान दिले तरी त्याचा शेतकर्‍यांना फार उपयोग होणार नसल्याचे पवारांनी स्पष्ट केले. 

कृषी संशोधन केंद्रे बंद केली त्याबाबत विचारले असता खा. शरद पवार म्हणाले, संशोधन केंद्रांसाठी जागा असणे आवश्यक आहे. मात्र, या प्रश्‍नाकडे गांभीर्याने पाहण्याची सरकारची भूमिका नाही. 
नाणार प्रकल्पबाबत विचारले असता खा. शरद पवार म्हणाले, या प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी जाणार होतो. मात्र, पायाला दुखापत झाल्याने जाता आले नाही. यासंदर्भात जाणकारांकडून अहवाल मागवला आहे. माहिती घेण्याचे काम सुरु असल्याचेही खा. पवार यांनी सांगितले.

आर्थिक ताकद नाही असे सांगून बीडमध्ये माघार : पवारांचा गौप्यस्फोट

विधानसभा निवडणुकीमध्ये परभणी, अमरावती या मतदारसंघांतील पोटनिवडणुकांमध्ये भाजपकडून उमेदवार पळवापळवीचे प्रकार घडत आहेत. याबाबत विचारले असता, खा. शरद पवार म्हणाले, धनंजय मुंडे यांनी कुणाबद्दलही हट्ट धरला नाही. आम्ही असा विचार केला की, परभणी ही  एकच जागा आहे. लातूर, उस्मानाबाद, बीड ही तीन जिल्ह्यांची जागा होती. या निवडणुकीत  तीन जिल्ह्यांत आपल्याला पक्षाचे काम वाढवता येईल. त्यामुळे या जिल्ह्यात काम करण्याचा निर्णय घेतला. मुंडे यांना आम्ही समजावून सांगितले. या ठिकाणी घेतलेला करेक्ट निर्णय आहे. त्यामुळे धनंजयला धक्का वगैरे काही नाही, तसे म्हणणे धनंजयवर अन्याय ठरेल. निवडणूक जाहीर झाल्यानंतर संबंधित उमेदवाराने माझी आर्थिक ताकद नाही, मी निवडणूक लढू शकत नाही, असे संबंधित उमेदवाराने सांगितल्याचा गौप्यस्फोट पवारांनी केला.

भुजबळ निर्दोष सुटतील, तेव्हा हर्षवायू होईल
छगन भुजबळ यांच्या जामिनाबाबत विचारले असता, खा. शरद पवार म्हणाले, त्यांना जामीन मिळाल्याचा आनंद आहे. मात्र, ही न्यायालयीन बाब आहे. अजून निकाल लागलेला नाही. मूळ केस जागेवरच आहे. या केसमधून ते बाहेर पडतील, त्यावेळी आम्हाला हर्षवायू, अत्यानंद होईल.