होमपेज › Satara › सुशीलकुमार शिंदे यांच्या नंतरच्या मुख्यमंत्र्यांमुळे काँग्रेसला अपयश

सुशीलकुमार शिंदे यांच्या नंतरच्या मुख्यमंत्र्यांमुळे काँग्रेसला अपयश

Published On: May 10 2018 2:02AM | Last Updated: May 10 2018 8:12AMसातारा : प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार व काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यातील राजकीय वैर पुन्हा उफाळून आले आहे. शरद पवार यांची तिसर्‍या आघाडीची जुळणी सुरू असताना पृथ्वीराजांनी शरद पवारांवर टीका केली होती. त्याला राहुल गांधी यांच्या भेटीचा व काँग्रेस आमदारांच्या चर्चेचा संदर्भ देत पवारांनी प्रत्युत्तर दिले असून काँग्रेस आमदारच म्हणू लागले आहेत की, सुशीलकुमार शिंदे यांच्यानंतर आलेल्या मुख्यमंत्र्यांमुळे राज्यातील काँग्रेसला अपयश आले. काँग्रेस आमदारांचा संदर्भ देत पवारांनी पृथ्वीराजांवर साधलेल्या निशाण्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

सातार्‍यात रयत शिक्षण संस्थेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत पत्रकार परिषदेत शरद पवारांनी पत्रकारांनी टाकलेले बाऊन्सर सीमेपार टोलवले. 
राहुल गांधी तुमच्या निवासस्थानी येऊन दोन वेळा भेटले. त्यावेळी काय चर्चा झाली, असे विचारले असता खा. शरद पवार म्हणाले, महाराष्ट्रात काम करण्यासंदर्भातील भूमिकेवर चर्चा झाली. आमच्यातील काही लोक उलटसुलट बोलतात, पण त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, असे राहुल म्हणाले. त्यांनी कुणाचे नाव घेतले नाही, पण दोघे मिळून एकत्र काम करू या, अशी चर्चा त्यांनी  माझ्यासमवेत केली. काहीजण कराड-सातार्‍याच्या पुढे जात नाहीत, असा टोलाही त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव न घेता लगावला. आम्ही किती जागा मिळवतो, कुणाचे सरकार बनेल हे आज ठरवणे शक्य नाही. पण सर्वांनी एकत्र व्हायला पाहिजे, सर्वांनी समंजसपणा दाखवावा, अशी त्यांची एकंदर भूमिका होती. राहूल गांधी हे प्रत्येक राजकीय प्रश्‍नांकडे  गांभीर्याने पहात आहेत, असेही ते म्हणाले. 

तुम्ही  कराडचा संदर्भ दिला. काँग्रेस व राष्ट्रवादीचे नुकसान काहीजणांनी केले. त्यांनी काम करण्यापेक्षा आपल्याच लोकांच्या चौकशा लावल्या. असे लोक राजकाणातून बाजूला ठेवणार का, याबाबत विचारले असता खा. शरद पवार म्हणाले, राष्ट्रवादीमध्ये कोण आहे आणि कुणी राहायचं हे राष्ट्रवादी ठरवणार तसेच काँग्रेसमध्ये कुणाला ठेवायचे हे काँग्रेस ठरवेल, त्यावर भाष्य करु इच्छित नाही. काही लोक तसे असतात. माझ्या वाचनात आले की राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा काढून घेतला नसता तर महाराष्ट्रात भाजप आलेच नसते, असे ‘ते’ कुठेतरी म्हणाले.  त्यावर मी काँग्रेसच्याच आमदारांना विचारले तर ते म्हणतात राज्यात सुशिलकुमार शिंदे यांचे नेतृत्व  बदलले नसते तर इथे काँग्रेसच राहिली असती. याचाच अर्थ इथे नंतर आले त्यांना राज्यात सत्ता प्रस्थापित करण्यात अपयश आले. असे मी म्हणत नाही तर काँग्रेसमधील लोक सांगत आहेत. त्यामुळे मला यावर भाष्य करायचे नाही, असेही खा. पवार यांनी स्पष्ट केले.