होमपेज › Satara › सातारच्या शांततेसाठी कबुतरे आकाशात

सातारच्या शांततेसाठी कबुतरे आकाशात

Published On: Feb 15 2018 1:58AM | Last Updated: Feb 14 2018 10:34PMसातारा : प्रतिनिधी

सातारा पोलिस मुख्यालयासमोरील शांतीदूत हा कबुतराचा पुतळा पुन्हा आहे त्याच ठिकाणी बसवण्याच्या कामाला बुधवारी सुरुवात झाली. यावेळी जिल्हा पोलिस प्रमुख संदीप पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन झाल्यानंतर मान्यवरांनी आकाशात 18 कबुतरे सोडून साखर व पेढे वाटले. या आनंदोत्सवामुळे पोलिसांनी नागरिकांना एकप्रकारे ‘व्हॅलेनटाईन डे’ चे गिफ्टच दिले.

दि. 14 फेब्रुवारी 2000 रोजी सातारा पोलिस मुख्यालयासमोर शांततेचा संदेश देणारा व जगभर मान्य असणारा कबुतराचा पुतळा बसवण्यात आला होता. मात्र, दि. 8 फेब्रुवारी रोजी सुशोभीकरण व वाहतुकीस अडथळा ठरत असल्याचे कारण समोर करून पोलिसांनी हा पुतळा  हटवला होता. पुतळा हटवत असताना सामाजिक कार्यकर्ते व प्रसिद्धी माध्यमांनी त्याला जोरदार विरोध केला होता. मात्र पोलिसी बळ वापरत अखेर मध्यरात्री मुख्यालयासमोरून पुतळा हटवण्यात आला.

कबुतराचा पुतळा हटवल्यानंतर दै.‘पुढारी’ने रोखठोक भूमिका घेत सातारकरांच्या भावना व्यक्त केल्या. अत्यंत परखडपणे ‘पुढारी’ने हा विषय हाताळल्यानंतर सातारकरांमधील उद्रेकाची भावना व्यक्त झाली. आंदोलनाची धार वाढत असतानाच जिल्हाधिकारी यांना भेटून सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनांनी पोलिसांच्या कृतीचा निषेध नोंदवला. पुतळ्याचे शिल्पकार निवृत्त पोलिस अधीक्षक सुरेश खोपडे यांनीही सातार्‍यात येऊन संताप व्यक्त केला होता.

मंगळवारी  पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी सातारकरांच्या भावनांचा आदर राखत कबुतराचा तो पुतळा पुन्हा आहे तिथेच बसवणार असल्याचे जाहीर केले. 
हा पुतळा बसवल्याच्या घटनेला  18 वर्षे पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून  बुधवारी हटवलेला पुतळा पुन्हा आहे त्याच ठिकाणी बसवण्याच्या प्रक्रियेला सुरूवात झाली. पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्या हस्ते कुदळ मारुन भूमिपूजन करण्यात आले. तत्पूर्वी 18 कबुतरे आकाशात सोडण्यात आली व साखर वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी प्रसिध्दी माध्यमातील मान्यवर, पक्षीय, सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, सातारकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.