Wed, Nov 21, 2018 20:16होमपेज › Satara › पिरवाडीमध्ये रस्त्यावर अवतरल्या गटारगंगा 

पिरवाडीमध्ये रस्त्यावर अवतरल्या गटारगंगा 

Published On: Mar 21 2018 1:43AM | Last Updated: Mar 20 2018 9:03PMखेड : वार्ताहर

निर्मल ग्राम पुरस्कार मिळालेल्या खेड ग्रामपंचायतीच्या हद्दीतील पिरवाडी गावाला जोडणार्‍या रस्त्यावरच गटारगंगा अवतरल्या असून सांडपाण्याची विल्हेवाट व्यवस्थित होत नसल्याने साचलेल्या पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी निर्माण झाली आहे. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून गावाला जोडणारा पर्यायी रस्ता नसल्याने नागरिकांना दुर्गंधीयुक्त पाण्यातूनच ये-जा करावी लागत असल्याने पिरवाडीतील महिलांनी जिल्हाधिकार्‍यांकडे धाव घेतली आहे. 

जिल्हा परिषदेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पिरवाडी गावात प्रवेश करतानाच उघड्या गटारावरील सांडपाणी रस्त्यावर आल्याने परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. स्त्यावर जागोजागी खड्डे पडून सांडपाण्याची डबकी साचली आहेत. सुमारे पाच ते सहा फूट खोलीच्या गटारातील पाण्यात म्हैस, डुक्कर बसत असून दिवसेंदिवस गटाराची खोली वाढत आहे. येथील अरूंद असलेल्या रस्त्यावरील तुंबलेल्या गटारातील पाणी जवळपास 100 ते 200 मीटर अंतरावर पसरल्याने नागरिकांना नाक धरुन जावे लागत आहे. येणार्‍या जाणार्‍या वाहनांकडून हे सांडपाणी नागरिकांच्या अंगावर उडत आहे. त्यातून मार्ग काढताना महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थ्यांना कसरत करावी लागत आहे.

रस्त्यावरील गटारगंगा बरोबर गावातील गटारांमध्ये साचणार्‍या पाण्यामुळे साथीचे आजार पसरले असून येथील अस्वच्छतेचे साम्राज्य नागरिकांच्या आरोग्याच्या मुळावर उठले आहे. याबाबत सुमारे दोनशे महिलांनी जिल्हाधिकार्‍यांकडे सह्यांचे निवेदन दिले असून गावाला जोडणारा पर्यायी रस्ता व सांडपाण्यावर योग्य उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.  याबाबत कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. 

Tags :Satara, Satara News, sewage problem, khed, clen, drainage line