Wed, May 22, 2019 22:20होमपेज › Satara › सातारा : लाखोंच्या उपस्‍थितीत सेवागिरी महाराजांचा रथोत्‍सव(व्‍हिडिओ)

सातारा : लाखोंच्या उपस्‍थितीत सेवागिरी महाराजांचा रथोत्‍सव(व्‍हिडिओ)

Published On: Dec 17 2017 5:37PM | Last Updated: Dec 17 2017 5:37PM

बुकमार्क करा

खटाव : प्रतिनिधी 

महाराष्ट्रासह शेजारच्या राज्यातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या पुसेगाव येथील रथोत्सवाला लाखो भाविकांनी उपस्‍थिती लावली. रथमार्गावरुन सेवागिरी महाराजांच्या पादुका आणि प्रतिमेची मिरवणूक मोठ्या उत्साहात सुरु झाली. टाळ, मृदंग, बॅंडच्या निनादात मिरवणूक शिवाजी चौकात आल्यावर लाखो सेवागिरी भक्तांची दर्शनासाठी झुंबड उडाली. संपूर्ण पुसेगाव नगरी सेवागिरी महाराजांच्या जयघोषाने दुमदुमुन गेली आहे.

आज सकाळी  सेवागिरी महाराजांची प्रतिमा व पादुकांची विधीवत पूजा करुन फुलांनी सजविलेल्या मानाच्या रथात प्रतिष्ठापना करण्यात आली. सिक्किमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील, राज्याचे बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री विजय शिवतारे, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, खासदार उदयनराजे भोसले,  आमदार जयकुमार गोरे, शशिकांत शिंदे, आनंदराव पाटील, आयुक्त चंद्रकांत दळवी, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, नितीन बानुगडे पाटील, रणजीत देशमुख यांच्या शुभहस्ते रथथपूजन करण्यात आले. यावेळी इतर मान्यवरांचीही उपस्‍थिती होती.

सेवागिरी महाराजांच्या रथ मिरवणूकीस सकाळी दहा वाजता मोठ्या उत्साहात सुरुवात करण्यात आली. टाळमृदंगाच्या गजरात ढोलताशे, सनई आणि बॅंडपथकाच्या निनादामुळे सर्व वातावरण सेवागिरीमय झाले होते. दर्शनाला येणाऱ्या भाविकांनी मोठ्या श्रध्देने नारळ, बेलफुल, पेढे, व नोटांच्या माळा रथावर अर्पण केल्याने रथ सकाळी ११ वाजताच शृंगारला होता. सुवर्णनगरीत आलेल्या लाखो भाविकांनी सेवागिरी महाराजांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच रांगा लावल्या होत्या. देवस्थान ट्रस्‍टच्या वतीने भाविकांना बुंदी प्रसादाचे वाटप करण्यात येत होते. रथोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.