Fri, Jul 19, 2019 05:36होमपेज › Satara › अल्पवयीन मुलीला प्रेमप्रकरणात मदत करणार्‍या बहिणींना शिक्षा

अल्पवयीन मुलीला प्रेमप्रकरणात मदत करणार्‍या बहिणींना शिक्षा

Published On: Aug 01 2018 1:36AM | Last Updated: Jul 31 2018 11:45PMसातारा : प्रतिनिधी

अल्पवयीन मुलीला लग्‍नासाठी फूस लावून पळवून नेण्यासाठी मदत केल्याप्रकरणी पाचवड येथील सख्ख्या बहिणींना मंगळवारी सातारा जिल्हा न्यायालयात शिक्षा झाली. दरम्यान, गेल्या वर्षी हे प्रकरण घडलेले असून अल्पवयीन मुलांच्या अजब प्रेमासाठी बहिणींना शिक्षा लागल्याने न्यायालय परिसरात त्याची जोरदार चर्चा रंगली होती.

सोनाली रमेश जमदाडे (वय 26) व काजल रमेश जमदाडे (वय 21, दोघी रा. पाचवड, ता. वाई) अशी शिक्षा लागलेल्या बहिणींची नावे आहेत. दोघींना एक वर्ष सक्‍तमजुरी व 1000 हजार रुपये दंड, तो न दिल्यास 3 महिने साधी कैद, अशी शिक्षा न्या.पारगावकर यांनी ठोठावली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, दि. 25 जून 2016 रोजी एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्यानंतर तिच्या आजीने भुईंज पोलिस ठाण्यात त्याबाबत तक्रार दिली. भुईंज पोलिसांचा शोध सुरु असतानाच ती मुलगी एका अल्पवयीन मुलासोबत रायगड पोलिसांना सापडली. रायगड पोलिसांनी दोघांना ताब्यात घेवून भुईंज पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी प्राथमिक चौकशी केल्यानंतर अल्पवयीन मुलीला फूस लावून पळून जाण्यासाठी जमदाडे बहिणींनी मदत केल्याचे समोर आले.

ही सर्व घटना समोर आल्यानंतर मुलीच्या आजीने  भुईंज पोलिस ठाण्यात तक्रार दिली. फौजदार आर.जे. दुधभाते यांनी त्यानुसार तपास करुन दोन्ही बहिणींना संशयित आरोपी करत तपास करुन जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. जिल्हा न्यायालयात दोन्ही पक्षाच्यावतीने जोरदार युक्‍तिवाद झाला. सरकार पक्षाच्यावतीने अ‍ॅड. महेश शिंदे यांचा युक्‍तिवाद ग्राह्य धरुन सोनाली व काजल जमदाडे यांना न्यायाधिशांनी शिक्षा ठोठावली. या खटल्यामध्ये एकूण 7 साक्षीदार तपासण्यात आले. प्रॉसिक्युशन स्कॉडचे पोलिस हवालदार शमशुद्दीन शेख, अजित शिंदे, बांगर, नंदा झांझुर्णे, कांचन बेंद्रे यांनी सहकार्य केले.