Fri, Jul 19, 2019 18:16होमपेज › Satara › सीसीटीव्हीत दिसले अन् पोलिसांना सापडले

सीसीटीव्हीत दिसले अन् पोलिसांना सापडले

Published On: Feb 21 2018 1:12AM | Last Updated: Feb 20 2018 11:24PMकराड : प्रतिनिधी

शहर पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यात ठाणे अंगलदाराला दरोडेखोरांच्या हालचाली संशयास्पद दिसल्या. त्यावर नजर ठेवून अन्य पोलिस कर्मचार्‍यांना ठिकाणावर पाठवल्याने दरोडेखोरांना पकडण्यात पोलिसांना यश आले. ठाणे अंमलदारा आप्पासाहेब ओंबासे यांच्या प्रसंगावधानाचे कौतुक जिल्हा पोलिसप्रमुख संदीप पाटील यांनी केले असून त्यांना रिवॉर्ड जाहीर केले.

दरोडेखोरांची टोळी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने शुक्रवारी पहाटे पकडली होती. पोलिसांनी थरारक पाठलाग केल्यानंतर दोन दरोडेखोर अंधाराचा फायदा घेत पसार झाले होते. कोल्हापूर जिल्ह्यातील या टोळीकडून सत्तुर, कोयता, कटावणी, चाकू अशी धारदार हत्यारे हस्तगत करण्यात आली. निलेश गणपती पांडव (वय 19, रा. गडमुडशिंगे-गांधीनगर, करवीर, जि. कोल्हापूर), किशन ऊर्फ किशोर उमाशंकर कुंभार (वय 20, रा. रेल्वेस्टेशनजवळ गांधीनगर, करवीर जि. कोल्हापूर), सिताराम राजू भोसले (वय 30, रा. रेल्वेस्टेशन जवळ, गांधीनगर, ता. करवीर, जि. कोल्हापूर) अशी पोलिसांनी पकडलेल्या संशयित दरोडेखोरांची नावे आहेत. सचिन ऊर्फ सच्या डांगणे (रा. चिंचवड गांधीनगर, कोल्हापूर), महादेव ऊर्फ महाद्या कापले (रा. गुडमुडशिंगी ता. करवीर, कोल्हापूर) हे दोघे अंधाराचा फायदा घेत पसार झाले होते. 

त्या रात्री शहर पोलिस ठाण्यात ठाणे अंमलदार म्हणून कॉन्स्टेबल आप्पासाहेब आंबासे कार्यरत होते. मध्यरात्रीच्या सुमारास त्यांना शहर पोलिस ठाण्यातील ठाणे अंमलदार कक्षातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यात पाच लोकांची संशयास्पद हालचाल दिसली. ओंबासे यांनी अधिक काळजीपुर्वक सीसीटीव्ही कॅमेरा पाहिला असता संशयितांच्या हातात घातक शस्त्रे दिसत होती. त्यामुळे त्यांना संशय आल्याने त्यांनी तात्काळ गस्त घालणार्‍या पोलिसांना खात्री करण्यासाठी तिकडे पाठवले. त्यांचा पोलिसांशी मोबाईलद्वारे सतत संपर्क होता. पोलिस कर्मचारी जेव्हा संशयित वावरत असलेल्या ठिकाणी गेले तेव्हा त्यांना ते दरोडेखोर असल्याची खात्री पटली. त्यानंतर इतर अधिकारी व कर्मचार्‍यांनी तिकडे धाव घेऊन तीन दरोडेखोरांना पकडले. पोलिस उपअधिक्षक नवनाथ ढवळे यांनी आप्पासाहेब ओंबासे यांच्या प्रसंगावधानाचे कौतुक केले. जिल्हा पोलिसप्रमुख संदीप पाटील यांनीही त्यांना रिवार्ड जाहिर केले आहे.