Thu, Apr 25, 2019 16:23होमपेज › Satara › सातार्‍यात शाळकरी मुलाचा बुडून मृत्यू

सातार्‍यात शाळकरी मुलाचा बुडून मृत्यू

Published On: Apr 09 2018 1:30AM | Last Updated: Apr 09 2018 1:30AMसातारा : प्रतिनिधी

येथील फुटक्या तलावामध्ये रविवारी सकाळी मित्रांसोबत पोहायला गेलेल्या सुमित शेखर आगे (वय 13, रा. जंगीवाडा) या शाळकरी मुलाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. सुमित हा इयत्ता नववीमध्ये शिकत होता, पोहताना दम लागल्याने तो बुडाला असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, या घटनेनंतर आगे कुटुंबीयांवर मोठा आघात झाला असून परिसरात हळहळ व्यक्‍त होत आहे.

रविवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास सुमित आगे हा पोहण्यासाठी फुटका तलाव येथे गेला होता. पोहत असतानाच त्याला अचानक दम लागल्याने तो तलावात बुडू लागला. नेमक्या त्यावेळी  तलावात पोहणार्‍यांची संख्याही अधिक होती. त्यामुळे या गोंगाटात हा प्रकार इतरांच्या लवकर लक्षात आला नाही. मात्र, सुमित बुडत असल्याचे काही जणांच्या लक्षात येताच त्याला पाण्यातून बाहेर काढण्यात आले.

मात्र, त्याचा काही उपयोग झाला  नाही. याबाबतची माहिती सुमितच्या कुटुंबियांना समजल्यानंतर ते हडबडून गेले. पोटच्या लेकराला बघण्यासाठी जीवाच्या आकांताने ते घटनास्थळी धावले. सुमित आता या जगातून नाहीसा झाल्याची जाणीव होताच त्यांनी केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. आगे कुटुंबियावर कोसळलेला दु:खाचा हा डोंगर पाहून आख्खा परिसर गलबलून गेला. या घटनेची नोंद शाहूपुरी पोलिस ठाण्यात झाली असून पोलिस पुढील तपास करत आहेत. 

खेळण्या-बागडण्याच्या वयातच...

सुमित आगे हा अनंत इंग्लिश स्कूलमध्ये इयत्ता नववीच्या वर्गात शिकत होता. त्याचे वडील रिक्षाचालक आहेत. सुमितच्या दुर्दैवी मृत्यूमुळे सारा परिसर सुन्‍न झाला आहे. खेळण्या-बागडण्याच्या वयातच त्याला काळाने असे निदर्यपणे हिरावून नेले. नियतीने केलेली ही क्रूर थट्टा हृदय हेलवणारी आहे. सुमितचे जाणे सार्‍यांनाच चटका लावून गेले. सुमितला आई, वडील व एक बहीण आहे.  दरम्यान, गेल्यावर्षीही याच फुटका तलावामध्ये बुडून एकाचा मृत्यू झाला असून दरवर्षी अशी दुर्घटना घडण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे पोहणार्‍या लहान मुलांची खबरदारी घेणे गरजेचे बनले आहे.

 

Tags : satara, satara news, school boy, drown, death,