Fri, Nov 16, 2018 21:22



होमपेज › Satara › लाचप्रकरणी शिक्षणाधिकारी पुनीता गुरव यांना पोलीस कोठडी

लाचप्रकरणी शिक्षणाधिकारी पुनीता गुरव यांना पोलीस कोठडी

Published On: May 08 2018 5:03PM | Last Updated: May 08 2018 5:02PM



सातारा : प्रतिनिधी

सातारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी पुनीता गुरव यांना 10 हजार रूपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी मंगळवारी सातारा जिल्हा न्यायालयात हजर केले असता, त्‍यांना 10 तारखेपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे. महाबळेश्वरच्या गटशिक्षणाधिकारी वंदना वळवी पसारच असून, एसीबी विभाग त्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान, पुनीता गुरव यांच्या घराची झडती घेण्याची प्रक्रिया सुरू असून संपत्तीची अद्याप माहिती समोर आलेली नाही.

वेतनश्रेणी फरक बिल काढून तो मंजूर करण्यासाठी तक्रारदार शिक्षकाकडे प्राथमिक शिक्षणाधिकारी पुनीता गुरव व गट शिक्षणाधिकारी वंदना वळवी यांनी 15 हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी तक्रारदार शिक्षकाने सातारा लाचलुचपत प्रतिबंध विभागात तक्रार केल्यानंतर सोमवारी पुनीता गुरव यांनी शिक्षण विभागाच्या त्यांच्या केबिनमध्ये लाचेचे दहा हजार रूपये स्वीकारले. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ त्यांना ताब्यात घेवून अटक केली. प्राथमिक शिक्षणाधिकारीच सापडल्याने सातारा जिल्ह्यासह शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

सोमवारी एसीबीच्या पथकाने पुनीता गुरव यांना अटक केल्यानंतर वंदना वळवी यांना अटक करण्यासाठी पोलिस गेले. मात्र वळवी पसार झाल्या असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान, मंगळवारी दुपारी पुनीता गुरव यांना जिल्हा न्यायालयात हजर केले असता त्यांना 10 तारखेपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे. वळवी पसार झाल्याने व यासंबंधी अधिक चौकशी करायची असल्याने त्या आधारावर त्‍यांना पोलिस कोठडी मिळाली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस उपअधीक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि आरिफा मुल्ला करत आहेत.