Fri, Mar 22, 2019 05:50
    ब्रेकिंग    होमपेज › Satara › शिकवणार्‍या ‘बाई’अधिकारी झाल्या अन् हपापल्या

शिकवणार्‍या ‘बाई’अधिकारी झाल्या अन् हपापल्या

Published On: May 08 2018 1:55AM | Last Updated: May 08 2018 1:12AM
सातारा : प्रवीण शिंगटे

जिल्ह्याचे मिनी मंत्रालय समजल्या जाणार्‍या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी पुनीता गुरव एसीबीच्या जाळ्यात सापडल्यामुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. ज्या क्षेत्रातून विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवले जाते. त्याच क्षेत्रातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी असे कारनामे केल्यानंतर विद्यार्थी व शिक्षकांनी कुणाकडून धडे घ्यायचे? असा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. आजवर विविध विभागातील अधिकारी लाच घेताना अटक झाले आहेत. मात्र, शिक्षण विभागात आणि त्याही महिला अधिकार्‍यांनी लाच घेतल्याचे दुर्मिळच म्हणावे लागेल. रामनगरच्या शाळेत गुरव बाई शिकवत होत्या तोवर ठीक होत्या. बाईंच्या अधिकारी झाल्या आणि हपापल्या. त्यामुळे पालक, विद्यार्थी, गुरूजन, जिल्हा परिषदेतील कर्मचारीही आता ‘अरेरे... मॅडम तुम्ही सुध्दा!’ असे म्हणू लागले आहेत. 

सातारा जिल्ह्याला ऐतिहासिक, सांस्कृतिक व शैक्षणिक अशी मोठी परंपरा आहे. शिक्षण क्षेत्रातही सातार्‍याचा देशामध्ये डंका वाजतो. एमपीएसससी आणि युपीएससी परिक्षांमध्ये जिल्ह्यातील विद्यार्थी चमकतात. त्यामुळे सातार्‍याची गुणवत्ता किती चांगली आहे हे राज्याला ठाऊक आहे. महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर स्व. यशवंतराव चव्हाण यांचा जिल्हा म्हणून सातार्‍याची ओळख आजतागायत आहे. त्यांच्या कार्यामुळे व जिल्हा परिषदेतील चांगल्या कारभारामुळे देशात सातारा जिल्हा परिषदेचा नाव लौकीक झाला आहे. 

मात्र, काही विभागाच्या अधिकार्‍यांच्या कारनाम्यामुळे नावाजलेल्या जिल्हा परिषदेला गालबोट लागले आहे. सोमवारी सायंकाळी चक्क शिक्षणाधिकारीच त्यांच्याच दालनात लाच घेताना रंगेहाथ सापडल्या. त्यामुळे जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. पुनीता गुरव या रामनगर येथील शाळेत प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. याच कालावधीत त्यांनी एमपीएससी परिक्षा दिली. त्यामुळे त्यांची शिक्षणाधिकारी म्हणून सोलापूर येथे निवड झाली. त्यानंतर त्यांची 3 वर्षापूर्वी सातार्‍यात प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती. 13 जून रोजी त्यांचा 3 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होत असल्याने त्या बदलीच्या प्रयत्नात होत्या. 

खासगी शाळांमधील एका शिक्षकाचे वरिष्ठ वेतनश्रेणीचे फरक बिल मंजूर करण्यासाठी त्यांनी लाच मागितली होती. गतवर्षी झालेल्या आतंरजिल्हा बदली शिक्षकांकडूनही त्यांनी मोठ्या प्रमाणात माया गोळा केली असल्याची चर्चा जिल्हा परिषदेत होती. गुरव यांच्या पतीच्या उचापती सुरू असल्याच्या लेखी तक्रारी अनेकदा जिल्हा परिषदेत गेल्या आहेत. पीआरसीवेळीही निधी गोळा केल्याची जोरदार चर्चा आहे. त्याचबरोबर शालेय पोषण आहार, शाळा दुरूस्ती बिले, शिक्षक बदल्या या गोष्टींमध्ये त्यांनी तोडपाणी करत संपत्ती जमवल्याची चर्चा जिल्हा परिषदेत सुरू होती. मात्र, आता गुरव यांनी लाच घेतल्याचे स्पष्ट झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाची अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. गुरव यांच्या हाताखालच्या कर्मचार्‍यांसह त्या कुणाकुणाला पैसे पुरवत होत्या त्या सर्वांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी होत आहे. 

मॅडमने नेमकी कोणती शपथ घेतली?
लाच स्वीकारण्यापूर्वी शिक्षणाधिकारी पुनिता गुरव यांनी एका कार्यक्रमात सहभाग घेतला होता. त्यावेळी त्या शपथ घेताना दिसत आहेत. मॅडम शपथ घेत होत्या तेव्हा त्यांच्या डोक्यात नेमके काय सुरु होते आणि मॅडमने नेमकी कोणती शपथ घेतली असावी?

एसीबीच्या रडारवर आता कोणता विभाग?
जिल्हा परिषदेत यापूर्वीही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने  माणचे गटशिक्षणाधिकारी वामन जगदाळे, पाटणचे गटशिक्षणाधिकारी विलास भागवत यांना अटक केली आहे. तर समाज कल्याण अधिकारी सचिन साळे व आरोग्य विभागातील अधिकार्‍यांवर एसीबीने कारवाई केली आहे. वर्षभराच्या कालावधीत एसीबीने जिल्हा परिषदेत तीन जणांना अटक केली. त्यामुळे इतर विभागही एसीबीच्या रडारवर आले आहेत. त्यासंदर्भात अधिकार्‍यांच्या विरोधात पैसे खाल्ल्याच्या तक्रारीही जात आहेत. त्यामुळे एसीबीचे अधिकारी डोळ्यात तेल घालून जिल्हा परिषदेवर लक्ष ठेवत आहेत.

Tags : satara, zp officer,  bribe