Mon, Mar 25, 2019 02:51
    ब्रेकिंग    होमपेज › Satara › झेडपीच्या मुलींनी पाहिला पॅडमॅन

झेडपीच्या मुलींनी पाहिला पॅडमॅन

Published On: Apr 09 2018 1:30AM | Last Updated: Apr 08 2018 10:31PMसातारा : प्रतिनिधी

महिला आरोग्याशी संबंधित आणि सामाजिक संदेश देणारा अक्षयकुमार यांचा बहुचर्चित पॅडमॅन चित्रपट रविवारी सातारा जिल्हा परिषदेच्या सुमारे 104 प्राथमिक शाळेतील  सुमारे 470 विद्यार्थीनींना मोफत दाखवण्यात आला. 

सातारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभाग, महिला व बालकल्याण तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्यावतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. समाजात मासिक पाळी व्यवस्थापनाबाबत जनजागृती व त्याबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील सुमारे 470  किशोरवयीन विद्यार्थिनींना पॅडमॅन चित्रपट सातार्‍यातील  राजलक्ष्मी चित्रपटगृहामध्ये सकाळी 9 ते 12 या वेळेत  दाखवण्यात आला.

मासिक पाळी ही नैसर्गिक क्रिया आहे. मात्र, ग्रामीण भागात याविषयी अनेक गैरसमज आहेत. त्यामुळे महिला व मुलींची कुचंबणा होते. आरोग्यविषयक अज्ञानामुळे, स्वच्छतेचा संदेश योग्यवेळी न पोहोचल्याने अनेक युवतींना आजारांना सामोरे जावे लागते. मासिक पाळीबाबत जनजागृती करून महिला व मुलींची कुचंबणा थांबवता यावी, यासाठी हा चित्रपट दाखवल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी सांगितले. महिला व मुलींमध्ये सॅनिटरी नॅपकिनचा वापर, स्वच्छतेचे महत्त्व यासाठी हा चित्रपट महत्वाची भूमिका निभावणार असल्याचे महिला व बालकल्याण सभापती वनिता गोरे यांनी सांगितले.यावेळी  जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नितीन थाडे,प्राथमिक शिक्षणाधिकारी पुनिता गुरव, गटशिक्षणाधिकारी रमेश चव्हाण शिक्षक, शिक्षिका उपस्थित होते.

नाटोशी ता. पाटण येथील सुमारे 6 विद्यार्थीनी सकाळी 1 तास लाँचमधून प्रवास करून चित्रपट पाहण्यासाठी शिक्षिकांसमवेत आल्या होत्या. त्यांची उपस्थिती अन्य विद्यार्थिनींना प्रेरणा देणारी ठरली. 

जिल्ह्यातून 470 मुलींनी पाहिला चित्रपट

या उपक्रमात जिल्हा परिषदेच्या आठवी ते दहावीमधील सातारा तालुक्यातील 5 शाळेतील 19 विद्यार्थीनी, कोरेगावमधील एका शाळेतील 4, सातार्‍यातील 14 शाळेमधील 124, म.श्‍वरमधील 3 शाळेतील 12, वाईत 2 शाळेतील 4, खंडाळ्याच्या एका शाळेमधील 6, माणमधील 3 शाळेतील 19, खटावमधील 3  शाळेतील 10, फलटणमधील 13 शाळेतील  105, कराडमधील 8 शाळेतील 39 व पाटण तालुक्यातील 51 शाळेमधील 128 अशा 104 शाळेतील 470 विद्यार्थीनींनी हजेरी लावली. त्यांचा जाण्या-येण्याचा 60 हजार 692 रुपयांचा खर्च जिल्हा परिषद प्रशासनाने केल्याचे सांगण्यात आले.

 

Tags : satara, satara news, satara zp, girls, Padmaan movie,