होमपेज › Satara › जिल्ह्यात मोहिमेचा धडाका : हजारो टन प्लास्टिक गोळा

प्लास्टिकमुक्तीसाठी झेडपीची वज्रमूठ

Published On: Dec 30 2017 12:36AM | Last Updated: Dec 29 2017 10:10PM

बुकमार्क करा
सातारा : प्रतिनिधी

सातारा जिल्हा हा महाराष्ट्रातील  पहिला प्लास्टिकमुक्त जिल्हा करण्याचा  निर्धार सातारा जिल्हा परिषदेने घेतला असून त्या अनुषंगाने जिल्ह्यातील 1 हजार 496 ग्रामपंचायतींमध्ये प्लास्टिक निर्मूलनाचा शुभारंभ शुक्रवारी झाला.गावोगावी मोठ्या संख्येने ग्रामस्थ, शालेय विद्यार्थी सहभागी होऊन पहिल्याच दिवशी लाखो टन कचरा गोळा करण्यात आला. 

ग्रामपंचायत नागठाणे येथे  प्लास्टिक निर्मूलनाचा शुभारंभ  जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर जगताप, महिला व बालविकास अधिकारी जावेद शेख, गटविकास अधिकारी डॉ. अमिता गावडे, सरपंच विष्णू साळुंखे, ग्रामस्थ व शालेय विद्यार्थी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला.साफसफाई व प्लास्टिक निर्मूलन  मोहिम राबविण्यात आली. मसूर, ता. कराड येथे आ. बाळासाहेब पाटील, कोळकी ता. फलटण येथे आ. दिपक चव्हाण यांच्यासह जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत सदस्य, युवा मंडळे, विद्यार्थी,  गावस्तरावरील सर्व शासकीय कर्मचारी,तालुका व जिल्हा स्तरावरील अधिकारी, विविध संस्थांचे अधिकारी व पदाधिकारी आदी घटकांनी मोठ्या प्रमाणात या मोहिमेत सहभाग नोंदवला.

प्लास्टिक निर्मूलनाच्या शुभारंभाप्रसंगी डॉ. शिंदे म्हणाले,  प्लास्टिक  हे न कुजणारे विषारी वायू पसरविणारे, जमीन नापीक बनवणारे, पशु, पक्षी, प्राणी यांच्या  जीवनात कॅन्सरसारखे रोग पसरवणारे व महापुरासारखी नैसर्गिक आपत्ती आणणारे आहे. प्लास्टिक नावाच्या राक्षसाचा समुळ नायनाट करण्यासाठी प्रत्येकाने प्लास्टिक वापर बंद करायला हवा. 

प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळून कापडी, ज्युट, किंवा कागदी पिशव्यांचा वापर करावा. यासाठी गावस्तरावरील  महिला बचत गटांनी  पिशव्या पुरवण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. त्यातून त्यांच्या आर्थिक उत्पन्नाचे साधन वाढण्यास मदत होणार आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी  गावात असणार्‍या सर्व दुकानदार, फळविक्रेते, मटण दुकानदारांना नोटीस देऊन प्लास्टिक पिशवी विक्री बंद करावी अन्यथा दंडात्मक कारवाई करण्याची नोटीस बजवावी, असे आवाहन करण्याबाबत सांगण्यात आले.ग्रामस्थांनी आपल्या घरातील निघणारा कचरा ओला व सुका कचरा वेगळा करूनच घंटागाडीत द्यावा. घरात निघणारा कचरा इतरत्र कोठेही टाकू  नये, अन्यथा दंडात्मक कारवाईचा इशारा चंद्रशेखर जगताप यांनी दिला.सातारा जिल्हा परिषदेने राज्यात  प्लास्टिक निर्मूलनाचे पहिले पाऊल टाकून नवा आदर्श निर्माण केला आहे.