होमपेज › Satara › झेडपीच्या बजेटमध्ये बळीराजा वार्‍यावर

झेडपीच्या बजेटमध्ये बळीराजा वार्‍यावर

Published On: Mar 22 2018 10:41PM | Last Updated: Mar 22 2018 10:29PMसातारा : प्रवीण शिंगटे 

जिल्ह्याचे मिनीमंत्रालय समजल्या जाणार्‍या  जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पात     बळीराजाला वार्‍यावरच सोडले आहे. कृषी विभागाच्या  1 कोटी 75 लाख, पशुसंवर्धनच्या 1 कोटी 6 लाख व समाजकल्याणच्या 1 कोटी 49 लाख रुपयांच्या निधीला कात्री लावली आहे. आरोग्य विभागाच्या निधीत सुमारे 1 कोटी 75 लाखांची कपात करण्यात आल्याने त्याचा ग्रामीण भागातील जनतेला आरोग्य सुविधा देण्यावर परिणाम होणार आहे. समाजकल्याणच्या निधीलाही ‘कट’ लावल्याने अनेक योजनांची वाट बिकट झाली आहे. 

कृषी विभागाच्या बजेटला कात्री

जिल्ह्यातील 70 टक्केहून अधिक जनतेचे जीवनमान कृषि उत्पन्नावर आधारीत आहे. यावर्षीच्या बजेटमध्ये 1 कोटी 20 लाख रुपयांची तरतूद केली असली तरी 1 कोटी 75 लाखाच्या निधीला कात्री लागली आहे. शेतकर्‍यांना पीक संरक्षण औजारासाठी 50 टक्के अनुदानावर नॅपसॅक, स्प्रेपंप व पॉवर स्प्रेपंप,  इंटरमेक स्प्रेपंप, युरिया ब्रिकेट, नारळ रोपे, शेतकर्‍यांना 50 टक्के अनुदानावर  सिंचन सुविधेसाठी काहीही तरतूद केली नाही. सातारा जिल्हा परिषदेने सामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून काम करण्याचा प्रयत्न केला आहे मात्र, कृषी विभागाला भरीव अशी तरतूद न केल्याने  शेतकरी प्रगतशील कसा होणार? असा प्रश्‍न  पडला आहे.

गाई वासरं मुकली; वैरण रूसली

पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून गाई व वासरांच्या भरवल्या जाणार्‍या  मेळावे व प्रदर्शनासाठी तसेच वैरण विकास बियाण्यासाठी या वर्षीही तरतूद केली नाही. त्यामुळे या प्रदर्शनाला गाई वासरे मुकली असून जनावरांची वैरणही रूसली आहे. वैरण विकास बियाण्यासाठी काहीही तरतूद केली नसल्याने  पशुधन जगवायचे कसे? असा प्रश्‍न शेतकर्‍यांना पडला आहे. पशुसंवर्धनचे मागील सुधारित अंदाजपत्रक   1 कोटी 51 लाख 65 हजार रुपयांचे होते.  यावर्षीच्या बजेटमध्ये फक्त 45 लाख रुपयांची तरतूद केली आहे. त्यामुळे यावर्षी सुमारे 1 कोटी 6 लाख रुपयांच्या निधीला कात्री लावली आहे. बजेटमध्ये जनावरांची औषधे, शेळी वाटप करणे, पशुपक्षी प्रदर्शन, कडबाकुट्टी संयंत्र वाटपसाठी तरतूद केली आहे.

निधीला   कट; समाजकल्याणची वाट बिकट

शोषित, वंचित व अल्पसंख्यांक समाजाचा विकास साधण्यात समाजकल्याण विभागाचा मोठा वाटा असतो.  समाजकल्याण विभागासाठी  2 कोटी 43 लाख 49 हजार रुपयांची तरतूद केली. मात्र,  गतवर्षीपेक्षा 1 कोटी 49 लाख 62 हजार रुपयांच्या निधीला कट लावला. पुरेसा निधी नसल्यामुळे  अनेक योजनांवर गंडांतर येणार असल्याचे चित्र अर्थसंकल्पात आहे. पिको फॉल मशिन, सौर कंदिल पुरवणे, अपंगांना तीन चाकी सायकल पुरवणे,  ऑईल इंजिन खरेदी, महिलांना डंक पुरविणे, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना टॅब पुरवणे, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मराठी व इंग्रजी विषयांचे  संगणक टंकलेखन प्रशिक्षण, मागासवर्गीय वस्तीत सामूहिक स्वच्छतागृह बांधणे, पाचवी ते बारावी मुलांना व  मुलींना सायकल वाटप, एम.एस.सी.आय.टी. प्रशिक्षण, मागासवर्गीय समाजमंदिरात ग्रंथालय सुरू करणे, शेतीसाठी विद्युत पंप पुरविणे, वस्तीतील समाजमंदिरांना  सतरंजी पुरवणे आदींसाठी बजेटमध्ये पूर्वी तरतूद केली जायची. यावर्षी मात्र, या साहित्यसामग्रीसाठी कोणतीही तरतूद केली नाही.  त्यामुळे समाजकल्याणच्या विविध योजना निधीवाचून मागास राहणार असेच चित्र आहे. यशवंत घरकूल योजना, मागासवर्गीय वस्तीतील जोडरस्ते, समाजमंदिर बांधकाम व दुरूस्ती, कडबाकुट्टी संयंत्र, अपंग कल्याण विविध योजना, गजीनृत्य साहित्य वितरण व स्पर्धा, वसतिगृहांना सोयीसुविधा, महिलांना घरघंटी पुरवणे आदि बाबींसाठी  तरतूद केली आहे. अपंग कल्याण कार्यक्रमाअंतर्गत 3 टक्के प्रमाणे 89 लाख 98 हजार रुपयांची तरतूद करण्यात आली असली तरी अशा वस्तू खरोखरच लाभार्थ्यांना मिळतात का? हे तपासण्याची मागणी होत आहे.