Tue, Jul 23, 2019 04:02होमपेज › Satara › झेडपीत टक्केवारीसाठी ‘बांधकामा’ची फोडाफोडी

झेडपीत टक्केवारीसाठी ‘बांधकामा’ची फोडाफोडी

Published On: Aug 20 2018 12:04AM | Last Updated: Aug 19 2018 11:04PMसातारा : प्रविण शिंगटे

जिल्ह्याचे मिनी मंत्रालय समजल्या जाणार्‍या सातारा जिल्हा परिषदेत टक्केवारीच्या नावाखाली  फोडाफोडी सुरू आहे. विविध ठिकाणी सुरु असलेल्या सुशोभीकरणामुळे झेडपीच्या इमारतीची पुरती वाट लागली आहे. टक्केवारीला हपापलेल्यांच्या या प्रतापामुळे अनेक विभागात पावसाच्या पाण्याची तळी निर्माण झाली असून कागदपत्रे भिजली आहेत. त्यामुळे कर्मचार्‍यांना काम करणे अवघड झाले आहे.
जिल्हा परिषदेमध्ये रोज हजारो नागरिक विविध कामासाठी येत असतात. ग्रामीण भागातील विकासाची कामे, राजकीय सूत्रे येथूनच हलत असल्याने सर्वसामान्य नागरिकांपासून अगदी थेट आमदार-खासदारांचाही झेडपीत राबता असतो. जिल्हा परिषदेत सध्या पदाधिकारी खुर्चीवर बसला की त्याला  टक्केवारीची आस लागते आणि ती पुरी करण्यासाठी सुशोभीकरणाच्या नावाखाली टक्केवारीचा घाट घातला जात आहे.

जिल्हा परिषदेच्या काही विभागांमध्ये खाबुगिरीच्या अनेक तर्‍हा आहेत. सभापतीची निवड झाली की केबिनपासून ‘स्वच्छते’ला सुरुवात होते. केबिनच्या डागडुजीवर लाखो रुपयांचा चुराडा केला जातो. त्यामध्ये अधिकारीही कमी नाहीत. अनेकांनी खुर्चीत बसल्यावर आपापली दालने पॉश करुन घेतली आहेत. आवश्यकता नसतानाही दुरूस्ती किंवा  नुतनीकरणाचा घाट घातला जात आहे. सुस्थितीत इमारत असतानाही दालनांच्या सुशोभिकरणाची कामे  काढली जात आहेत. सुशोभिकरण, इमारत नुतनीकरणाच्या कामांसाठी  विनाकारण तोडफोड सुरू आहे. जिल्हा परिषद इमारतीचा बांधकाम नकाशा आहे. मात्र, सध्या बांधकामाची तोडफोड करुन बेकायदेशीरपणे बदल केले जात आहेत. अधिकारी तसेच पदाधिकार्‍यांच्या या मनमनीपणाकडे कोणाचेही लक्ष नसल्याचे चित्र दिसून येते. 

झेडपी इमारतीच्या भक्कमतेवर टक्केवारीचा घाव बसत असल्यामुळे ही  इमारत सर्वत्रच खिळखिळी झाली आहे. सुशोभीकरणाच्या नावाखाली ही तोडफोड अशीच सुरू राहिल्यास या इमारतीला धोका पोहोचण्याचा संभव आहे. 

तोडाफोडीमुळे सध्या जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत, कृषी व अन्य विभागात भिंतीतून पाणी पाझरून येत आहे. त्यामुळे बहुतांश विभागात पाण्याची तळी निर्माण झाली आहेत. कृषी विभागातील महत्वाची कागदपत्रे भिजली  असून संगणकही खराब झाला आहे. यामुळे शॉर्टसर्कीट होण्याचा धोका आहे. टक्केवारीच्या नादात  या गंभीर बाबीकडे कोणाचेही लक्ष नाही.

जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीमधील चारही मजल्यावरील पॅसेजमध्ये  सध्या  जुन्या फरशीच्या जागेवर नव्याने टाईल्स फरशी बसविण्याचे काम काही दिवसांपासून सुरू आहे. जुन्या फरशीमुळे सफाई व्यवस्थीत होत नव्हती त्यामुळे सर्वत्र स्वच्छता करूनही त्याचा काहीही उपयोग होत नव्हता, त्यामुळे या फरशीच्या जागी नव्याने पांढर्‍या रंगाची टाईल बसवण्याचा घाट घातला आहे. या टाईल्समुळे  झेडपीला शोभा आली. मात्र पाय घसरून पडणार्‍यांची संख्या वाढू लागली आहे. 

थातूरमातूर काहीतरी कामे काढून निधी खर्च करण्याचा हा खटाटोप पदाधिकार्‍यांचा असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे. अधिकार्‍यांकडूनही पदाधिकार्‍यांच्या मर्जीने  शासकीय निधी हडपण्याचे काम खुल्लमखुल्ला सुरू असल्याची चर्चा झेडपीत सुरु आहे.