Thu, Apr 18, 2019 16:16होमपेज › Satara › जिल्हा परिषदेतील ‘संक्रांती’वर न झालेल्या आमदारकीचे ‘तीळगूळ’ 

जिल्हा परिषदेतील ‘संक्रांती’वर न झालेल्या आमदारकीचे ‘तीळगूळ’ 

Published On: Jan 15 2018 1:44AM | Last Updated: Jan 15 2018 12:22AM

बुकमार्क करा
‘शेंगसोला’शिरवळ : वार्ताहर

सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतील दारूण पराभवानंतर राजकीय संक्रांत आलेल्या व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापासून दूर गेलेल्या तसेच  इकडे जाणार की तिकडे जाणार या चर्चेत असलेल्या नितीन भरगुडे-पाटील यांच्या हातात न झालेल्या आमदारकीचे तीळगूळ देवून राष्ट्रवादीचे हेवीवेट नेते अजितदादा पवार यांनी त्यांना राष्ट्रवादीत राहण्याचा एकप्रकारे ‘वाणवसाच’ दिला. शिरवळ येथील कृषि प्रदर्शनाच्या कार्यक्रमात ‘2009 सालीच प्रभाकर घार्गेऐवजी मी तुला आमदार करणार होतो’ असा  शेंगसोला व्यासपीठावर मांडून अजितदादांनी  अनेकांना जीभ चावायला लावली. भरगुडेंच्या राजकीय ‘भोगी’वर  चिमटे काढत अजितदादांनी त्यांना तब्बेत जपण्याचा सल्ला देत तृप्तीचा ढेकर द्यायला भाग पाडले. 

त्याचे असे घडले की, शिरवळ, ता. खंडाळा येथे सह्याद्रि कृषि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला माजी उपमुख्यमंत्री आ. अजित पवार होते तर राजकीय व्यासपीठापासून दूर असलेले नितीन भरगुडे-पाटील हेही आ. मकरंद पाटील यांच्या बरोबरीने  व्यासपीठावर होते.  यावेळी जिल्हा परिषदेचे कृषि सभापती मनोज पवार, मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाळासाहेब सोळस्कर, जि.प. सदस्य उदय कबुले, दीपाली साळुंखे, मकरंद मोटे,हणमंतराव साळुंखे, राजेंद्र तांबे, अश्‍विनी पवार, चंद्रकांत यादव, गुरूदेव बरदाडे, सी.जी. बागल, दीपा बापट, लक्ष्मी पानसरे यांची उपस्थिती होती.  

कार्यक्रमादरम्यान नितीन भरगुडे -पाटील यांच्या हातात माईक होता. ते सत्काराला नावे पुकारत होते. यादी वाढल्याचे लक्षात येताच  व्यासपीठावरूनच अजितदादा म्हणाले, नितीन आवर, ह्यांनीच तुम्हाला पाडलंय अन् तू काय सत्कार करतोय सगळ्यांचे. अन्  ज्याच्याकडे जेवायला गेलो तो जेवण झाल्यावर म्हणला मीच त्याला पाडलं. आवरा सत्कार. दादांच्या बोलण्यावर थांबतील ते नितीन भरगुडे पाटील कसले! त्यांनी लगेचच पलटवार केला. ते म्हणाले, दादा, 90 टक्के यातले माझ्याविरोधीच काम करणारे स्टेजवर आहेत आणि ‘त्या’ गड्याला तर मी पडल्याचा असुरी आनंदच झाला. त्यावर स्टेजवर एकच हशा पिकला. 

प्रत्यक्ष भाषणात अजितदादांनी या सगळ्याचा पुन्हा उहापोह केला.  ते म्हणाले, नितीन  तुम्ही जिल्हा परिषद लढायलाच नको होती. त्याऐवजी चिरंजीवाला जिल्हा परिषद लढायला लावायची होती. तुम्हाला मी जिल्हा पारिषदेचे उपाध्यक्ष केले. प्रभाकर घार्गेऐवजी तुम्हाला 2009लाच आमदार करणार होतो, असा गौप्यस्फोटही आ. अजितदादांनी केला. त्यावर लगेचच नितीन भरगुडे खालूनच म्हणाले, पाहुण्यांन्या सांगा की (मकरंद पाटील यांना) त्यावर लगेचच आ. मकरंद पाटील स्टेजवरूनच म्हणाले, दादा, तसलं काही सांगू नका हे निवडणूक लढवंल. त्यावर लगेचच नितीन भरगुडे म्हणाले, दादा तुम्ही सांगाल तसे मी करेन. त्यावर अजितदादांनी भरगुडेंना टोला हाणला, नितीनराव आधी तब्बेतीची काळजी घ्या. शरद पवारसाहेबांची जशी इच्छाशक्ती आहे तशी इच्छाशक्ती ठेवा. 
या राजकीय कुलंगडीची जोरदार चर्चा खंडाळा तालुक्यात सुरू झाली. दरम्यान, राज्य सरकारवर टीका करताना आ. अजित पवार म्हणाले, राज्यातील सरकार फसवे आहे. शेतकर्‍यांना त्यांच्या शेतीमालाला आधारभूत किंमत मिळत नाही. पुढच्या काळात त्यांचे सरकार येईल की नाही? याची शाश्‍वती त्यांच्याच मंत्र्यांना नाही. 

आ. मकरंद पाटील म्हणाले, खंडाळा तालुक्यात धोम-बलकवडी, नीरा-देवधरचे पाणी आल्याने दुष्काळी भागाचा कलंक पुसण्यात यश आले आहे. तालुक्यात कृषि प्रदर्शन भरवण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे. प्रास्तविक नितीन भरगुडे-पाटील यांनी केले. स्वागत व आभार संदीप गोळे यांनी मानले.