Tue, Jul 16, 2019 01:50होमपेज › Satara › ठोसेघर अपघातात युवक ठार

ठोसेघर अपघातात युवक ठार

Published On: Jul 22 2018 11:06PM | Last Updated: Jul 22 2018 10:41PM  सातारा : प्रतिनिधी

परळी, ता.सातारा येथे गणेशमूर्ती ठरवून पुढे ठोसेघरला जावून परत येत असताना पाठीमागून क्रूझर गाडीने दुचाकीला धडक दिल्याने शरद मारुती कदम (वय 25, रा.सोनगाव संमत निंब ता.सातारा) हा युवक जागीच ठार झाला. दरम्यान, अपघातानंतर क्रुझर चालक पसार झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, शरद कदम हा रविवारी पाच ते सहा मित्रांसोबत दुचाकींवरुन परळी येथे गणेशमूर्ती ठरवण्यासाठी गेले होते. नेहरु युवा हे त्यांचे सार्वजनिक गणेशोत्सव  मंडळ आहे. परळी येथील काम झाल्यानंतर ते सर्व मित्र पुढे ठोसेघरचा धबधबा पाहण्यासाठी गेले. ठोसेघरचा धबधबा पाहून झाल्यानंतर परत येत असताना दुपारी पाच वाजण्याच्या सुमारास दुचाकीला पाठीमागून एका क्रूझरची धडक बसली. ही धडक एवढी भीषण होती की शरद कदम जागीच ठार झाले तर त्याचा सहकारी रणजित पवार हा जखमी झाला.अपघातानंतर पाठीमागून येणार्‍या इतर सहकार्‍यांनी दोघांना तत्काळ उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात आणले. मात्र, शरदचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आले. रणजित गंभीर जखमी असल्याने त्याला पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले.