Tue, Mar 19, 2019 11:22होमपेज › Satara › काळाबरोबरच्या कुस्तीत ते पाचही पराभूत..!

काळाबरोबरच्या कुस्तीत ते पाचही पराभूत..!

Published On: Jan 13 2018 9:18PM | Last Updated: Jan 13 2018 9:18PM

बुकमार्क करा
औंध : सचिन सुकटे

औंध येथील यमाईदेवी यात्रेनिमित्त घेण्यात आलेल्या जंगी कुस्त्यांचे मैदान आटोपून कुंडलकडे निघालेल्या पैलवानांच्या ट्रॅक्सला अपघात झाला. यामध्ये पाच पैलवानांसह सहाजणांचा जागीच मृत्यू झाल्याने या घटनेबाबत औंधसह परिसरातील कुस्ती शौकिनांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, औंधमधील मैदानामध्ये प्रतिस्पर्ध्यांना चितपट करणारे हे मल्ल काळाला मात्र चितपट करू शकले नाहीत.

याबाबत अधिक माहिती अशी, शुक्रवारी रात्री नऊ वाजता औंध येथील कुस्ती मैदान आटोपून येथील वसंत जानकर, रसूल शेख यांच्याकडे कुंडल कुस्ती संकुलातील मल्लांनी भोजनही केले. भोजन आटोपून हे सर्व मल्ल ट्रॅक्सने कुंडलकडे रवाना झाले. यावेळी रात्री सुमारे अकराच्या सुमारास शिरगाव फाटा वांगी, (ता. कडेगाव) नजीक ट्रॅक्स व ट्रॅक्टरचा जोरदार अपघात झाला. यामध्ये पाच पैलवानांसह सहा जणांचा जागीच मृत्यू झाला.

शुक्रवारी औंध येथील कुस्ती मैदानासाठी शुभम घार्गे सहोली, (ता. कडेगाव), सौरभ माने (मालखेड, ता. कराड), आकाश देसाई (काले, ता. कराड), विजय शिंदे (रामापूर, ता. पलूस), अविनाश गायकवाड (फुफिरे, ता. शिराळा) हे मल्ल आले होते. 

या मल्लांपैकी औंधच्या मैदानामध्ये विजय शिंदे, आकाश देसाई, शुभम घारगे यांनी प्रतिस्पर्ध्यांना धुळ चारून मैदानामध्ये चटकदार कुस्त्या केल्या आणि विजयी मल्ल विजयी मुद्रेने परतीच्या दिशेने प्रवास करीत असतानाच काळाने त्यांच्यावर झडप घातली. यामुळे संपूर्ण कुस्ती क्षेत्रावर शोककळा पसरली.

हे सर्व मल्ल अठरा ते बावीस वयोगटातील आहेत. ते कुंडल येथील क्रांती कुस्ती क्रीडा संकुल येथे मागील काही वर्षांपासून प्रशिक्षण घेत होते. यामधील सौरभ माने हा मालखेड (ता. कराड) येथील मल्ल आहे. मागील दोन वर्षांपासून तो कुंडल येथील क्रांती क्रीडा संकुलात प्रशिक्षण घेत आहे. विजय शिंदे (रा. रामापूर) हा न्यू मोती बाग तालिम संघ सांगली येथून नुकताच कुंडल क्रांती क्रीडा संकुलात दाखल झाला होता, तर खुफिरे (ता. शिराळा) येथील अविनाश गायकवाड हा पंधरा दिवसांपूर्वी प्रशिक्षणासाठी आला होता. अतिशय चपळ व चलाख असे हे नव्या दमाचे मल्ल होते. कुंडल क्रांती क्रीडा संकुलाचे नाव नुकतेच नावारुपास येत असताना काळाने या युवा मल्लांवर घाला घातला. नॅशनल चॅम्पियनशिप मिळविणारा शुभम घारगे हा देखणा युवा मल्लही या अपघातात गेला तसेच आकाश देसाई हा उत्कृष्ट व चपळ कुस्तीपट्टू म्हणून ओळखला जातो. पट काढणे, घिस्सा मारणे यामध्ये त्याची विशेष ख्याती होती.

एकाचवेळी एका कुस्ती क्रीडा संकुलाचे पाच मल्ल अपघातात दगावल्याने पश्चिम महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

ही दुर्दैवी घटना समजताच खटाव तालुक्यातील अनेक मल्लांनी कुंडल तसेच कराडकडे धाव घेतली. शनिवारी संपूर्ण दिवसभर या दुर्दैवी घटनेची चर्चा सुरु होती. दरम्यान, शनिवारी सकाळी औंध ग्रामपंचायत कार्यालयासमोर औंध ग्रामस्थ, श्रीमंत बाळराजे तालिम संघ यांच्यावतीने अपघातातील मृतांना श्रध्दांजली वाहण्यात आली.