Sun, Mar 24, 2019 06:34होमपेज › Satara › लाईफ जॅकेटविना प्रवाशांचे लाईफ रामभरोसे

लाईफ जॅकेटविना प्रवाशांचे लाईफ रामभरोसे

Published On: Jan 14 2018 1:55AM | Last Updated: Jan 13 2018 10:34PM

बुकमार्क करा
सातारा : दीपक देशमुख

डहाणू येथे समुद्रात बोट उलटून चार विद्यार्थी बुडाल्यामुळे पालकांसह पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. सातारा जिल्ह्यात धोम, कोयना, बामणोली, वेण्णालेक, कण्हेर, उरमोडी आदी जलाशयांमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक नौकाविहार करत असतात. याठिकाणचे व्यावसायिक मात्र प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार न करत फक्त स्वत:ची तुंबडी  भरण्यासाठी नियम डावलून क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेत असल्याचे दिसत आहे. यावर प्रशासनाने अंकुश ठेवण्याची गरज असल्याची मागणी होत आहे. 

पालघर जिल्ह्यातील डहाणू येथे सुमारे 40 महाविद्यालयीन विद्यार्थी बसलेली बोट समुद्रात उलटल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. यातील 36 विद्यार्थ्यांना वाचवण्यात यश आलं असलं तरी 4 जणांना जीव गमवावा लागला आहे. या घटनेची चौकशी होईलच. परंतु, अशा घटना घडू नयेत, यासाठी वेळीच उपाययोजना करण्याची गरज आहे. दरम्यान, सातारा जिल्ह्यात प्रवाशांच्या सुरक्षेचे तीनतेरा वाजले असून फक्त स्वत:च्या तुंबड्या भरण्याचा एककलमी कार्यक्रम बोटमालकांनी आरंभला आहे. बोटी खचाखच भरल्याशिवाय पाण्यात शिरत नाहीत तर लाईफ जॅकेटचीही वानवा आहे. नियमांना कोलदांडा दिल्याने पर्यटकांच्या सुरक्षेचे तीनतेरा वाजले आहेत. 

जिल्ह्यात धोम, कोयना, बामणोली, वेण्णालेक, कण्हेर, उरमोडी आदी जलाशयांमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक नौकाविहार करत असतात. याठिकाणी असलेल्या बोटी सुस्थितीत आहेत का नाहीत? सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना केल्या आहेत का? आपत्कालिन स्थिती उद्भवल्यास काय उपाययोजना करण्यात येतात, याचा आढावा वरिष्ठ अधिकार्‍यांनी डहाणू दुर्घटनेच्या पार्श्‍वभूमीवर घेण्याची गरज आहे.  बोटींचे चालक प्रशिक्षित आहेत का? त्यांच्याकडे बोट चालवण्याचा परवाना आहे का? इन्युरन्स आहे का? असे विविध प्रश्‍न यानिमित्ताने पुढे येत आहेत. 

बोटीत क्षमतेपेक्षा अधिक माणसे भरली की, अपघाताची शक्यता वाढत असते. बोट चालवणारे जादा पैशाच्या आशेने मर्यादेपेक्षा अधिक लोकांना बोटीत घेतात. बोटीची किती क्षमता अन् प्रवासी बसवले किती? याचा काहीच ताळमेळ पैशाच्या लालसेपोटी ठेवला जात नाही. परंतु, प्रवाशांनी तरी निदान बोट खचाखच भरल्यानंतर त्यामध्ये न बसण्याची काळजी घेतली पाहिजे. 

डहाणूत 4 निष्पाप जीव प्राणास मुकले. सातारा जिल्ह्यात खरोशी  दुर्घटनेत (1999) 16 जण बुडाले होते. त्यामुळे वेळीच सर्व नौकाविहार होणार्‍या स्थळांची पाहणी करून सुरक्षिततेबाबत आढावा घ्यावा, 
अशी मागणी नागरिकांतून होत आहे.